‘रन फॉर फन’
By Admin | Updated: April 13, 2015 01:31 IST2015-04-13T01:30:58+5:302015-04-13T01:31:46+5:30
‘रन फॉर फन’

‘रन फॉर फन’
नाशिक : ‘हवाओ से कहें दो, हमे कम ना समझे, हम कदमो से नहीं, हौसलो से उडा करते हैं’ अशा स्फूर्तीदायक शायरीने प्रोत्साहित होत ‘रन फॉर फन’ या स्पर्धेत तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या अधिकाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयानेही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
निमित्त होते, देवळाली येथील तोफखाना केंद्रामधील फिल्ड रेजिमेंटच्या फुटबॉल मैदानावर आयोजित ‘रन फॉर फन’ स्पर्धेचे. बुधवारी (दि.१५) तोफखाना केंद्राचा ७४वा वर्धापनदिन साजरा होणार आहे. यानिमित्ताने तोफखाना केंद्राच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा बारा वर्षांपर्यंतची मुले (तीन कि.मी.), तरुण-तरुणी, महिला, पुरुष अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारीवर्ग या गटांमध्ये (पाच कि.मी.) पार पडली. तोफखाना केंद्राचे कमांडंट लेफ्टनंट जनरल ए. के. मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थित हवेत फुगे सोडून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, उगवत्या दिनकराच्या साक्षीने बालगोपाळांनी तीन किलोमीटरचे लक्ष्य गाठण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर तरुण-तरुणींसह महिलांनी धाव घेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. अखेरच्या टप्प्यात पुरुष अधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी पाच किलोमीटरच्या शर्यतीसाठी
धावले. या स्पर्धेत लहान गटात संदीप चव्हाण, अमिश या मुलांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला. अठरा वर्ष वयोगटात रोहित नायर (प्रथम), सौरभकुमार सिंग (द्वितीय), प्रयश राठी (तृतीय) हे विजयी
झाले. तसेच अधिकारी वर्गाच्या गटात लेफ्टनंट रोहितकुमार झा, लेफ्टनंट मनोजकुमार, लेफ्टनंट विकास कमल यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला आणि महिलांच्या गटात अमिता सिंग, देवरानी सिंग, प्रियंका सिंग यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. सूत्रसंचालन लेफ्ट. कर्नल अभिषेकसिंग गौतम व
स्मृती शर्मा यांनी केले. (प्रतिनिधी)