नियम धाब्यावर : मागेल त्याला पदांची खैरात; जम्बो कार्यकारिणी झाली तयार
By Admin | Updated: August 22, 2016 00:04 IST2016-08-21T23:56:26+5:302016-08-22T00:04:26+5:30
भाजपात घटनाबाह्य पदांचा सुळसुळाट

नियम धाब्यावर : मागेल त्याला पदांची खैरात; जम्बो कार्यकारिणी झाली तयार
नाशिक : घटनेप्रमाणे पक्षाची रचनाच कायम असल्याचा दावा करणाऱ्या भाजपात सध्या घटनाबाह्य पदांचा सुळसुळाट सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कनवाळू शहराध्यक्षांनी मागेल त्याला पदे देण्याचा सपाटा सुरू केला आहे. घटनेनेच पदांची संख्या मर्यादित ठेवली असताना आता जम्बो कार्यकारिणी तयार झाली आहे.
भाजपात घटनेनुसार चालते, असा दावा या पक्षाच्या वतीने नेहमीच केला जातो. शहराध्यक्षाची निवड झाल्यानंतर पक्षातील अन्य पदाधिकारी नियुक्त करण्याचा त्यांना अधिकार असतात. त्यानुसार सर्वसंमतीने आणि सामाजिक तसेच भौगोलिक समतोल साधून पदाधिकारी नियुक्त केले जातात. नाशिकमध्येही अशा प्रकारे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी कार्यकारिणी घोषित केली. मात्र, नंतर एकेक पद नियुक्तीचा सपाटा सुरू केल्याने मूळ पदांवर काम करणाऱ्यांना काही अर्थच उरला नाही.
उपाध्यक्षपदासाठी एकूण आठ पदे आहेत. मात्र, त्यात शहराध्यक्षांनी गिरीश पालवे, प्रकाश घुगे, दिनकर पाटील, श्रीमती पुष्पा शर्मा, भारती बागुल अशी पाच पदे वाढविली आहेत. त्यामुळे एकूण आठ ऐवजी तेरा उपाध्यक्ष झाले आहेत. सरचिटणीसपदाची चारच पदे मंजूर असताना अध्यक्षांनी काशीनाथ शिलेदार यांना अतिरिक्त नियुक्त केल्याने एकूण ५ सरचिटणिसांची संख्या पूर्णांकात गेली आहे. चिटणीसपदांची मंजूर संख्या आठ असताना तेथे आणखी पाच जणांची भरती करण्यात आली आहे. यात गुलाब सय्यद, श्याम पिंपरकर, राजेंद्र संगमनेरकर, राजश्री शौचे, अजित ताडगे यांची वर्णी लावण्यात आली आहे.
याशिवाय अनेक आघाड्यांमध्येही भर घालण्यात आली आहे. त्यानुसार ग्राहक मंच, वाहतूक समस्या, गुजराथी सेल, क्रीडा आघाडी, व्यापार आघाडी, प्रज्ञावंत आघाडी, तीर्थ क्षेत्र आघाडी, अपंग आघाडी, बारा बलुतेदार आघाडी, ज्येष्ठ कार्यकर्ता मंच अशा अनेक नव्या आघाड्या तयार करण्यात आल्या आहेत. पक्षात घटनामान्य पदे असताना त्यापेक्षा अतिरिक्तपदांचे कोणतेही महत्त्व नाही. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर गोतावळा जमा करण्यात आला असला तरी संबंधितांना मिरवण्याखेरीज पदांना महत्त्व नाही. पक्षातील कथित निष्ठावान, जुने ज्येष्ठ, प्रदेश पातळीवर काम करणारे सारचे मूग गिळून बसल्याने सामान्य कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले आहेत. (प्रतिनिधी)