विसर्जन मिरवणुकीतील वाहनांची आरटीओकडून तपासणी
By Admin | Updated: September 3, 2014 00:44 IST2014-09-03T00:44:31+5:302014-09-03T00:44:51+5:30
विसर्जन मिरवणुकीतील वाहनांची आरटीओकडून तपासणी

विसर्जन मिरवणुकीतील वाहनांची आरटीओकडून तपासणी
नाशिक : सोमवार, दि. ८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक मंडळांमार्फत वापरल्या जाणाऱ्या वाहनांची यांत्रिक तपासणी आरटीओकडून केली जाणार असून, तपासणीसाठी आरटीओने दि. ६ व ७ सप्टेंबर रोजी कार्यालयीन वेळेत स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून देखावे आणि मूर्तींसाठी वाहने वापरली जातात. मिरवणुकीत ऐन गर्दीच्या प्रसंगी वाहने नादुरुस्त होणार नाहीत आणि कोणतीही दुर्घटना घडणार नाही, यासाठी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी आपल्या वाहनांची आरटीओकडून यांत्रिक तपासणी करून तसे प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक आहे. आरटीओने दि. ६ व ७ सप्टेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत वाहन तपासणीकरिता स्वतंत्र सुविधा प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपलब्ध करून दिली आहे. वाहनधारकांनी सकाळी १० ते ५ या वेळेत पेठरोड येथील कार्यालयात वाहनाची यांत्रिक तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे. वाहन तपासणीसाठी आणताना वाहनांची कागदपत्रेही सोबत आणण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दि. ५ सप्टेंबर रोजी येवला येथे प्रादेशिक परिवहन विभागाचे शिबिर असून, त्याठिकाणीही तालुक्यातील वाहनांची यांत्रिक तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)