देना बँकेत ६२ लाखांचा अपहार
By Admin | Updated: August 13, 2016 00:11 IST2016-08-13T00:11:21+5:302016-08-13T00:11:53+5:30
मनमाड : बॅँक अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

देना बँकेत ६२ लाखांचा अपहार
मनमाड : शहरातील देना बॅँक या राष्ट्रीयीकृत बँकेत मयत पेन्शनधारकाच्या खोट्या स्वाक्षऱ्या व कागदपत्रे तयार करून तब्बल ६२ लाख रुपयांचा अपहार झाला असल्याची फिर्याद मनमाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन बँक अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील देना बॅँकेचे व्यवस्थापक विनीत रमेशचंद्र कपूर, रा.कीर्तन सोसायटी, मातोश्रीनगर, नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माहे जून २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीमध्ये बॅँकेचे तत्कालीन दोन अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांनी आपापसात संगनमत करून मनमाड देना बॅँकेतील १५ पेन्शनधारक व १ कर्ज खातेधारक यांच्या खात्यातून स्वत:चे यूजर आयडी क्रमांकाचा गैरमार्गाने उपयोग करून त्याद्वारे पेन्शनधारक व कर्जधारकाच्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी बनावट व खोटे दस्तऐवज तयार केले. त्याद्वारे एटीएम कार्ड देऊन पेन्शनधारक मयत झालेले असताना स्लिपवर खोट्या सह्या करून वेळोवेळी मनमाड व शिर्डी येथील एटीएममधून रक्कम काढून ६१ लाख ७४ हजार ९८० रुपयांचा अपहार करून बॅँकेची व खातेधारकांची फसवणूक केली. या प्रकरणी बॅँक अधिकारी ओमीकुमार, मनीष मित्तल, सिंगल विंडो आॅपरेटर हर्षल चापके, कीर्ती शर्मा, एटीएम सुरक्षा रक्षक दशरथ दराडे यांच्या विरोधात मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(वार्ताहर)