शैवांच्या वैराग्याची ‘शाही’ अनुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2015 22:49 IST2015-09-25T22:36:31+5:302015-09-25T22:49:45+5:30
त्र्यंबक : अखेरच्या पर्वणीची मिरवणूक

शैवांच्या वैराग्याची ‘शाही’ अनुभूती
त्र्यंबकेश्वर : फुलांनी सुशोभित केलेल्या विविध रथांत विराजमान महंत... साधूंकडून होणारे दांडपट्टा, तलवारबाजीचे मर्दानी प्रदर्शन... खांद्यावर भक्तिभावाने मिरवले जाणारे ध्वज, निशाण... ढोल-ताशा, डीजेच्या तालावर थिरकणारे साधू आणि साथीला अखंड सुरू असलेला ‘हर हर महादेव’चा गजर अशा चैतन्यमय वातावरणातील शैव आखाड्यांच्या शाही मिरवणुकीने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. साधू-महंतांच्या दर्शनाने कृतकृत्य झालेल्या भाविकांनी मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करून भक्तिभाव व्यक्त केला आणि आता थेट बारा वर्षांनीच पाहायला मिळणारा हा अद्भुत सोहळा डोळ्यांत आणि कॅमेऱ्यांत साठवून घेतला.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अखेरच्या शाही पर्वणीसाठी पारंपारंगत नील पर्वत, खंडोबा महाराज मंदिर मार्गावरून शाही मिरवणुकीला पहाटे ३ वाजता प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वीच रात्री बारा वाजेपासून या मार्गाचा दुतर्फा ताबा भाविकांनी घेतला. बरोबर ३ वाजेच्या ठोक्याला जुना आखाड्याची धर्मध्वजा वाजतगाजत पायथ्याशी येताच ‘बम बम भोले’चा गजर करण्यात आला. महंत श्री हरिगीरीजी महाराज यांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आल्यानंतर मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. तत्पूर्वी श्री पंच दशनाम आवाहन व श्री अग्नी आखाड्याच्या साधूंनी मिरवणुकीची तयारी सुरू केली. जुना आखाडा व पंच दशनाम आवाहन आखाड्याच्या इष्टदेवता एकत्रितपणे मार्गस्थ झाले. जवळपास तासभर ही मिरवणूक सुरू होती. त्यानंतर सव्वाचार वाजता पंचायती श्री निरंजनी आखाड्याची मिरवणूक खंडोबा महाराज पटांगणावर येताच तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत श्री. नरेंद्र गिरीजी महाराज या आखाड्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला व पाठोपाठ मिरणवूकही हळूहळू मार्गस्थ झाली.
सव्वापाच वाजता पंचायती महानिर्वाणी आखाड्याचे शाही मिरवणूक मार्गावर आगमन झाले. त्यानंतर पंचायती आनंद व पंचायती अटल आखाड्यानेही कुशावर्ताकडे वाजत गाजत प्रस्थान केले. साधारणत: दोन तासांच्या विलंबाने म्हणजे पावणे आठ वाजता बडा उदासीन आखाड्याची मिरवणुकीचे कुशावर्त कुंडाच्या पाठीमागील मार्गाने आगमन झाले. नऊ वाजता नया उदासीन व त्यानंतर पावणे दहा वाजेच्या सुमारास निर्मल पंचायतीने ‘बोले सो निहाल, सत् श्री अकाल’ म्हणत कुशावर्तात स्वत:ला झोकून दिले.