तरसाळी फाटा रस्त्याची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:17 IST2018-02-27T00:17:30+5:302018-02-27T00:17:30+5:30
तरसाळी फाटा ते भंडारपाडे या तीन किलोमीटर अंतरावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

तरसाळी फाटा रस्त्याची चाळण
औंदाणे : तरसाळी फाटा ते भंडारपाडे या तीन किलोमीटर अंतरावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावर असलेल्या हत्ती नदीवरील पुलाचे काम सुमारे पंधरा वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. कठडे नसल्याने रात्रीच्या वेळेस शेतकरी व वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. बांधकाम विभागाने त्वरित पुलाची व रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी पारिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. येथील हा रस्ता भाक्षी व दोधेश्वर देवस्थानकडे जाण्यासाठी जवळचा आहे. तसेच सटाणा, नामपूर व गुजरात बाजारपेठेत शेतमाल वाहतुकीसाठी सोयीचा असल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. अवजड वाहनांमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्या उखडल्या आहेत. दुचाकी चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. डांबर उखडून गेल्याने खडी वर आली आहे. यामुळे वाहने पंक्चर होणे, नादुरुस्त होण्याच्या घटना घडत आहेत. पंधरा वर्षांपूर्वी पंचायत समितीचे माजी सभापती चिला निकम यांच्या हस्ते हत्ती नदीवरील पुलाच्या बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले होते. निधी मिळत नसल्याने ठेकेदाराने काम अर्धवट सोडले असल्याचे बोलले जात आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण करून रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.