जिल्ह्यातील सहाशे दारू दुकानांवर गंडांतर
By Admin | Updated: March 10, 2017 01:53 IST2017-03-10T01:53:02+5:302017-03-10T01:53:14+5:30
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य मार्गावरील पाचशे मीटर अंतराच्या आतील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णयाने जिल्ह्यातील सहाशे दुकानांवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली

जिल्ह्यातील सहाशे दारू दुकानांवर गंडांतर
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य मार्गावरील पाचशे मीटर अंतराच्या आतील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय देऊन त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्याच्या केलेल्या सूचनेबर हुकूम जिल्ह्यातील अकराशेपैकी सहाशे दुकानांवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली असून, सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यासमवेत राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून अशा दुकानांचा शोध घेऊन त्यांची मोजणी सुरू आहे.
दोन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेची सुनावणी करताना या संदर्भातील आदेश जारी केला आहे. राष्ट्रीय व राज्य मार्गावर दरवर्षी वाढत जाणाऱ्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करीत न्यायालयाने बहुतांशी अपघात हे चालकाच्या नशेमुळे होत असल्याचे निरीक्षण नोंदविले होते व त्यासाठी जबाबदार असलेले राष्ट्रीय व राज्य मार्गावर पाचशे मीटर अंतराच्या आतील मद्यविक्रीचे दुकानांचे परवाने १ एप्रिलनंतर नूतनीकरण न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. न्यायालयाच्या या निर्णयावर मद्यविक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकाही दाखल करण्यात आली, परंतु न्यायालय आपल्या निर्णयावर कायम राहिले. न्यायालयाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अवघे वीस दिवस शिल्लक असून, आता या निर्णयाचा फेरविचार होणे शक्य नसल्याचे पाहून मद्यविक्रेत्यांनीही पर्याय शोधण्यास सुरुवात केली, त्याचप्रमाणे या आदेशाची अंमल बजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागानेदेखील राष्ट्रीय व राज्य मार्गावर असलेल्या मद्यविक्री दुकानांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)