पावसाने बळीराजा सुखावला
By Admin | Updated: July 14, 2016 00:48 IST2016-07-14T00:36:15+5:302016-07-14T00:48:43+5:30
येवला : पालखेडच्या आवर्तनामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

पावसाने बळीराजा सुखावला
येवला : शनिवारपासून झालेल्या पेरणीयोग्य पावसाने बळीराजा सुखावला असला तरी येवला तालुक्यातील दुष्काळ अजून संपलेला नाही. दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही आहे. अशातच येवला शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी पालखेडचे पाणी आवर्तन येवल्यात मंगळवारी मध्यरात्री पोहोचले. या पाण्यामुळे केवळ शहर व तालुक्यातील काही गावांची पिण्याच्या पाण्याची गरज भागणार आहे. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याने दिलासा दिला असे म्हणण्याची वेळ आली आहे. संपूर्ण जून कोरडाच गेला. जुलैच दुसरा आठवडा आणि पुनर्वसू नक्षत्राने पावसाला सुरुवात झाली. आणि किमान पेरण्या ८० टक्क्यापर्यंत आटोपल्या. आगामी चार दिवसात १०० टक्के पेरण्या होतील असा अंदाज आहे. ७० मिमी पावसाने केवळ पेरण्यायोग्य परिस्थिती झाली असली तरी विहिरी कोरड्याठाक आहेत.
पालखेडच्या पाणी आवर्तनाने येवला तालुक्यातील सर्वच बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हे बंधारे पालखेडच्या पूरपाण्याने भरून दिले तर शेतशिवारात पाणी फिरेल आणि विहिरीलाही पाणी उतरेल. अन्यथा पिण्याच्या पाण्याची समस्या कायम राहील. पालखेड डाव्या कालव्यातून ७२० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. शहर साठवण तलाव, ३८ गाव पाणी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले जातील. पाणीटंचाईची झळ व चांगलेच चटके शोषिक येवलेकरांना बसले आहेत.
सद्या येवला शहर व ३८ गाव पाणी योजनेला पाणीपुरवठा करणारे तलाव भरून देणेसाठी पालखेड डावा कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहेत.
हे तलाव भरून झाल्यानंतर येवले तालुक्यातील पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील चारी क्र. ५२ पर्यंतचे सर्व बंधारे भरून द्यावेत कारण येवले तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असून, सर्व बंधारे कोरडे
आहेत. आजही तालुक्यात ९ टँकरद्वारे २२ गावे व सहा वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. तेव्हा पाण्याची टंचाई लक्षात घेता लाभ क्षेत्रातील सर्व बंधारे भरून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)