लालित्यपूर्ण पदन्यासाने खुलले ‘रूप-कथक’
By Admin | Updated: July 25, 2014 00:42 IST2014-07-24T23:47:16+5:302014-07-25T00:42:04+5:30
गुरुपौर्णिमा महोत्सव : कलानंद नृत्यसंस्थेतर्फे आयोजन; गुरुप्रति कृतज्ञतेचा भाव व्यक्त

लालित्यपूर्ण पदन्यासाने खुलले ‘रूप-कथक’
नाशिक : आपल्या लालित्यपूर्ण पदन्यासाने मुग्ध करणारा आणि कथकचे विविधांगी रंग दर्शविणारा ‘रूप-कथक’ कार्यक्रम कलानंद कथक नृत्यसंस्थेच्या विद्यार्थिनींनी सादर करत गुरुप्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला.
महाकवी कालिदास कलामंदिरात कलानंद कथक नृत्यसंस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवास आजपासून सुरुवात झाली. पंडित जसराज यांच्या संगीताने नटलेली गणेश वंदना सादर झाल्यानंतर संस्थेच्या चिमुरड्या विद्यार्थिनींनी पद्मजा फेणाणी यांच्या रचनेवर नृत्याविष्कार पेश केला. तीनतालातील नृत्यरचनांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. त्यानंतर ‘सावन घन गरजे’, ‘गुरुप्रणाम’ या रचना सादर झाल्या. झपतालातील वेगळ्या रूपाचेही दर्शन घडविण्यात आले. कलानंदच्या ज्येष्ठ विद्यार्थिनींनी सादर केलेले विविध जातींमधील कवित्तही कार्यक्रमाचे वेगळेपण ठरले. भाव प्रदर्शनात ‘डगर चलत’ हा बिंदादिन महाराजांच्या तीन ठुमऱ्यांसहीत सादर केलेला कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. बागेश्री रागातील तराणाने कार्यक्रमाची उंची गाठली. नृत्यदिग्दर्शन संजीवनी कुलकर्णी व सुमुखी कुलकर्णी यांनी केले, तर निवेदन वृषाली कोकाटे यांनी केले. साथसंगत कुणाल काळे (तबला), प्रशांत महाबळ (संवादिनी), मोहन उपासनी (बासरी), आशिष रानडे (गायन), अनिल धुमाळ (सिंथेसायझर) यांनी केली. (प्रतिनिधी)