शासन प्रशासनात प्रसारमाध्यमांची भूमिका
By Admin | Updated: April 13, 2015 01:40 IST2015-04-13T01:40:26+5:302015-04-13T01:40:59+5:30
शासन प्रशासनात प्रसारमाध्यमांची भूमिका

शासन प्रशासनात प्रसारमाध्यमांची भूमिका
नाशिक : समाजाच्या उन्नतीसाठी शासन असंख्य योजना राबवत असून, त्या लोकांपर्यंत पोहोचवताना लोकजागृतीचे महत्त्वाचे काम वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनी करावे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे उपआयुक्त के. एन. गवळे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहनिमित्त शासन प्रशासनात प्रसारमाध्यमांची भूमिका या विषयावरील कार्यशाळेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रा. अनंत येवलेकर, पत्रकार शैलेंद्र तनपुरे, माहिती उपसंचालक सतीश लळीत, शिक्षणक्रम समन्वयक श्रीकांत सोनवणे, आकाशवाणीचे शैलेश माळोदे, सहायक उपआयुक्त वंदना कोचुरे आदि उपस्थित होते.सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग हा समाजातील दुर्बल, मागास, पीडित व वंचित घटकांसाठी योजनांच्या माध्यमातून विकासाचे काम करीत आहे, असे सांगून गवळे म्हणाले की, शासनाची भूमिका अलीकडच्या काळात बदलली आहे. मंत्रालयापासून अगदी गावपातळीपर्यंत शासनाचे विविध विभागदेखील सामाजिक न्यायाच्या भूमिकेतूनच काम करीत आहे.पत्रकारांनी शासन आणि समाजातील समन्वयकाची भूमिका घ्यावी, असे माहिती उपसंचालक लळीत यांनी सांगितले. सध्याच्या युगात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माहितीची क्रांती होताना दिसते आहे. पण समाजाच्या उन्नतीसाठी माहितीच्या क्रांतीबरोबरच सामाजिक क्रांती होणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनादेखील वरपांगी काम मान्य नव्हते. त्या काळातदेखील राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक सुधारणा व सामाजिक स्वातंत्र्य मिळेल ते खरे स्वातंत्र्य असेल अशी त्यांची भूमिका होती, असे लळीत म्हणाले. यावेळी प्रा. अनंत येवलेकर, शैलेश माळोदे, श्रीकांत सोनवणे आदिंनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्रीमती कोचुरे यांनी केले. कार्यशाळेला पत्रकार, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)