रोकडोबावाडीत दुहेरी हत्त्याकांड
By Admin | Updated: August 9, 2016 01:13 IST2016-08-09T01:13:11+5:302016-08-09T01:13:36+5:30
गूढ कायम : नागरिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

रोकडोबावाडीत दुहेरी हत्त्याकांड
नाशिकरोड : देवळालीगाव रोकडोबावाडी वालदेवी पुलालगत नदीकिनारी रविवारी (दि़७) मध्यरात्री झालेल्या दुहेरी हत्त्याकांडप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मात्र, या घटनेतील प्रत्यक्षदर्शी गंभीर जखमी युवक बोलण्याच्या स्थितीत नसल्याने या खुनाच्या घटनेबाबत गूढ निर्माण झाले आहे़
देवळालीगाव रोकडोबावाडी येथील रहिवासी अकबर ऊर्फ गुड्डू अन्वर शेख (३४), गुलाब करीम शेख (३०) व संदीप रघुनाथ जैन (३०, तिघेही राहणार रोकडोबावाडी) हे रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास रोकडोबावाडी पुलाजवळील नदीकिनारी मद्यधुंद अवस्थेत बसलेले होते़ त्यावेळी अचानक ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांचे नातेवाईक व परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली़
गुलाब शेख व संदीप जैन हे दोघे कच्च्या रस्त्यावर थोड्याशा अंतरावर जखमी अवस्थेत पडलेले होते, तर अकबर शेख हा नदीकिनारी पाण्यालगत जखमी अवस्थेत होता़ या घटनेची माहिती परिसरातील रहिवाशांनी पोलिसांना कळविताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ मात्र, गुलाब शेखचा मृत्यू झाला होता, तर अकबर शेख व संदीप जैन हे गंभीर जखमी असल्याने त्यांना त्वरित बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ उपचार सुरू असतानाच अकबर शेखचाही मृत्यू झाला़ तर जैनला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़