रोहयो, सेसच्या निधीची माहिती मिळत नाही
By Admin | Updated: July 5, 2015 00:50 IST2015-07-05T00:50:26+5:302015-07-05T00:50:48+5:30
पंचायत समिती सदस्य मोरेंचा आरोप

रोहयो, सेसच्या निधीची माहिती मिळत नाही
नाशिक : नांदगाव तालुक्यांतर्गत राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व पंचायत समिती सेसच्या निधी नियोजनाची माहिती मिळत नसल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे यांनी नांदगाव गटविकास अधिकाऱ्यांकडे तसेच ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्याकडे केली आहे. तसेच नांदगाव पंचायत समितीत एक अनिल पाटील नामक ठराविक कर्मचाऱ्यांकडे वर्र्षानुवर्षे हे आर्थिक कामकाजाच्या टेबलाचे काम असल्याने त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप करीत संबंधित कर्मचाऱ्याची अन्यत्र बदली करावी, अन्यथा शिवसेना स्टाइल आंदोेलन करण्याचा इशारा या पंचायत समिती सदस्याने दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, पंचायत समितीत येणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि अभ्यागतांना साधी पिण्याच्या पाण्याची सोय नसताना सेसमधून पंचायत समिती इमारतीतून कॅमेरे बसविण्यात आले आहे. वास्तविक पाहता पंचायत समितीच्या इमारतीची दुरवस्था झालेली असताना पंचायत समितीवरील मजल्यावर शौचालयात पाण्याची व्यवस्था नसल्याने शौचालयात दुर्गंधी पसरलेली असताना सेसच्या निधीचा असा दुरुपयोग करण्यात येत असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)