नदीपात्रात दगडी मूर्ती
By Admin | Updated: December 26, 2016 02:21 IST2016-12-26T02:21:24+5:302016-12-26T02:21:45+5:30
गोदाकाठ : गाळ काढताना पुरात वाहून आलेल्या अनेक वस्तू बाहेर

नदीपात्रात दगडी मूर्ती
नाशिक : कोरडेठाक पडलेल्या गोदावरी नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पात्रातील गाळ काढताना या ठिकाणी अनेक प्रकारच्या दगडी मूर्ती तसेच काही मौल्यवान चीजवस्तूही सापडत असल्याने बघ्यांची गर्दी होत आहे.
गोदापात्रात सर्वत्र गाळ साचला असल्याने त्यातून दुर्गंधी येत असल्याच्या अनेक तक्रारी पर्यटकांकडून करण्यात आल्या आहेत. संपूर्ण गोदापात्रात अभावानेच पाणी आढळून येते. तर इतरत्र सर्वत्र गाळ साचला आहे. सदर प्रकरणी महापालिकेकडे अनेक पर्यावरणवाद्यांनी तक्रार करून पात्राची स्वच्छता करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने जेसीबीच्या साह्याने स्वच्छता करण्यात येत आहे.
पावसाळ्यात नदीला महापूर आल्यामुळे नदीकाठावरील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली. परिसरातील घरे, दुकाने आणि झोपड्यांनाही पुराचा फटका बसला. नागरिकांना घरे, दुकाने सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. मात्र घर, दुकानांतील सर्व चीजवस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्याप्रमाणेच काठावरील अनेक मंदिरांमधील दगडाच्या मूर्तीदेखील वाहून गेल्या होत्या. आता या मूर्ती आणि काही वस्तू नदीपात्रात सापडत आहेत. यामध्ये गणपती आणि हनुमानाच्या मूर्तींची संख्या अधिक आहे. लहान आकारातील या मूर्ती असून, संबंधित मंदिर ट्रस्ट, प्रशासनाकडून मूर्तींची पुन्हा विधिवत प्रतिष्ठापना केली जात आहे.
पात्रातील गाळात अनेक वस्तूदेखील मिळू लागल्यामुळे त्या शोधण्यासाठी काही गरीब मुले, स्त्री-पुुरुष गर्दी करू लागले आहेत. त्यांना बाजूला सारून गाळ काढावा लागत आहे.