Nashik Crime : मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील खंबाळे व माणिकखांब या दोन्ही गावांच्या सीमारेषेवर असलेल्या श्रीहरी पेट्रोल पंपावर मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास चार जणांच्या टोळक्याने हातात तलवारी, काठ्या घेऊन कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करत पेट्रोल पंप लुटण्याचा प्रकार घोटीजवळ घडला. दरोडेखोरांनी पंपावरील कर्मचाऱ्यांवर तलवारीने वार करत जबर मारहाण केली. रोख रक्कम व मोबाइल घेऊन दरोडेखोर पसार झाले.
याप्रकरणी घोटी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. खंबाळे शिवारात महामार्गावर असलेल्या श्रीहरी पेट्रोल पंपाच्या पाठीमागील शेतातून मध्यरात्री रात्री १२:३० वाजेच्या सुमारास तरुणांनी हातात तलवारी, काठ्या घेऊन हल्ला केला. या पंपावर दोन कर्मचारी होते. अचानक चौघा लुटारूंनी तलवारीने हल्ला करत मारहाण करण्यास सुरुवात केल्याने या हल्ल्यात संतोष रमेश मोहिते व शांताराम धोंडू रेवाळे या दोघांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यात असलेली पैशांची बॅग हिसकावून व खिशातील रक्कम काढून घेतली. रोख १५ हजार व मोबाइल असा १८ हजारांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. घोटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, घोटीचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक उदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी भेट देऊन सीसीटीव्ही तसेच घटनाक्रमाचा आढावा घेतला.