Nashik Crime : भरदिवसा अंबड येथील श्री ज्वेलर्स या दुकानावर सोमवारी दरोडा टाकणाऱ्या तिघांपैकी एकाला बेड्या ठोकण्यास गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला यश आले आहे. नीलेश उर्फ शुभम बेलदार (२५, रा.दत्तनगर, चुंचाळे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून साडे चार तोळे सोने व साडे सहा तोळे चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
अंबड पोलिस ठाणे हद्दीतील महालक्ष्मीनगर भागातील एका सराफी दुकानात दोघे दरोडेखोर तोंडाला रूमाल बांधून शिरले. त्यांनी गावठी पिस्तूलचा धाक दाखवून दागिने लुटून पळ काढला होता. वरिष्ठ पोलिस निरिक्षक मधुकर कड यांनी दोन तपास पथके तयार करून दरोडेखोरांचा माग काढण्याचा आदेश दिला होता. पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार महेश साळुंके, विशाल काठे, मुख्तार शेख, अप्पा पानवळ, अमोल कोष्टी, विशाल देवरे आदींच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. यानुसार पथकाने सिन्नरफाटा येथे सापळा रचला. तेथे बेलदार हा गुन्ह्यातील बुलेट दुचाकीने आला असता पथकाने शिताफीने त्यास ताब्यात घेतले. दोन पथके मागावरबेलदार याच्यावर यापूर्वीही सातपूर येथे मोबाइल चोरीचा एक गुन्हा दाखल आहे. त्याने त्याच्या आणखी दोन साथीदारांच्या मदतीने सराफी दुकान लुटले. त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले असून परिस्थिती जेमतेम असल्याचे पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले. त्याचे साथीदारदेखील निष्पन्न झाले असून दोन पथके त्यांच्या मागावर खाना करण्यात आल्याचे कड म्हणाले.
बुलेट घेऊन होता सज्जबेलदार हा त्याच्या दोन साथीदारांना घेऊन महालक्ष्मीनगरात आला. या तिघांनी अगोदर परिसराची रेकी केली. त्याने दुकानापासून पुढे काही मीटरवर दोघांना उतरविले आणि हा दुचाकी घेऊन पुढे जाऊन कॉलनी रस्त्याच्या वळणावर उभा राहिला. तेथे दुचाकी सुरू ठेवत तो सज्ज होता. दोघांनी दुकानात लूट करून पळत येताच त्यांना घेऊन पसार झाला. हा मूळ पाचोऱ्याचा रहिवासी आहे.