जिल्ह्यातील रस्ते भगवेमय

By Admin | Updated: September 25, 2016 00:41 IST2016-09-25T00:29:10+5:302016-09-25T00:41:58+5:30

निफाड, सिन्नर, चांदवड, ओझर : शिक्षक संघातर्फे स्वच्छता अभियान

The roads in the district are called Bhagwam | जिल्ह्यातील रस्ते भगवेमय

जिल्ह्यातील रस्ते भगवेमय



नाशिक : मराठा क्र ांती मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव विविध मार्गांद्वारे अनेक वाहनांतून नाशिककडे रवाना झाले. प्रत्येक वाहनास भगवे ध्वज लावण्यात आल्याने सर्व रस्ते भगवेमय झाले
होते. पेठ येथील प्राथमिक शिक्षक संघातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
निफाड : शहरातून नाशिकला जाण्यासाठी शिवाजी चौकातून बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी ८ वाजेच्या सुमारास येथील शिवाजी चौकात मराठा बांधव, तरुण, महिला, तरुणी एकत्र जमले. शिवाजी चौकात सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले होते. प्रत्येक वाहनाला भगवे झेंडे व स्टिकर लावण्यात आले होते. एका जीपच्या अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठे तैलचित्र लावण्यात होते. हे तैलचित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. रविराज मंगल कार्यालयासमोरही वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी सव्वाआठच्या सुमारास ‘एक मराठा, लाख मराठा’ या व इतर घोषणा देत मराठा बांधव रवाना झाले.
(लोकमत ब्यूरो)
पेठ : सकल मराठा समाज गोल्फ क्लब मैदानावर एकवटला असताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांनी तपोवनातील मोर्चाच्या जागेची स्वच्छता करून एक नवा आदर्श घालून दिला.
मराठा क्र ांती मोर्चानिमित्ताने लाखोंच्या संख्येने मराठा समाज नाशिकच्या तपोवनात आला होता. या ठिकाणी आयोजक व सामाजिक संस्थांच्या वतीने चहापान व अल्पोपहार देण्यात आला. मोर्चा गोल्फ क्लब मैदानाकडे मार्गस्थ झाल्यानंतर प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, जिल्हाध्यक्ष आर. के. खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली परिसराची स्वच्छता करण्यात आली. जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शिंदे-पळसे ग्रामपंचायतीने घंटागाडी उपलब्ध करून दिली होती. स्वच्छता मोहिमेत मिलिंद गांगुर्डे, धनराज वाणी, साहेबराव अहिरे, उमेश बैरागी, राजू मोरकर, सागर जळगावकर यांच्यासह प्राथमिक शिक्षक संघांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
घोषणांनी परिसर दुमदुमला
ओझर : मराठा क्र ांती मोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळपासून येथील खंडेराव महाराज मंदिराजवळ समाजबांधवांनी जमण्यास सुरुवात केली. ‘जय भवानी, जय शिवाजी’ यासह इतर घोषणा देत मराठा बांधव वाहनांद्वारे नाशिककडे रवाना झाले. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तब्बल २० हजार ओझरकरांनी मोर्चात सहभाग घेतला. माळी समाजातर्फेनाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी मराठा नाव छापलेल्या भगव्या टोप्यांसह काळा रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. येथील सर्व समाजातील मान्यवरांनी हाताला काळ्या फिती बांधून कोपर्डी घटनेचा निषेध केला. त्यानंतर सर्व समाजबांधवांना व चालकांना वाहतूक नियम समजून सांगितल्यानंतर मराठ्यांचा ताफा विविध वाहनांतून नाशिकच्या दिशेने रवाना झाला. प्रत्येक वाहनास भगवा झेंडा लावलेला होता. मुंबई-आग्रा महामार्गाच्या दुतर्फा भगवे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे महामार्ग भगवामय झाला होता. मालेगाव, सटाणा, चांदवड, नांदगाव, देवळा व निफाड तालुक्यातून नाशिककडे येणाऱ्या वाहनांनी संपूर्ण महामार्ग फुलून गेला होता. मोर्चात लहान मुले, वयोवृद्ध, तरुण, महिला आदिंसह अपंगबांधवदेखील सहभागी झाले होते. मुलींची संख्या लक्षणीय होती. सकाळी ७ वाजेपासूनच महामार्गावर नाशिककडे येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली होती. पिंपळगाव टोल नाका पूर्णपणे मुक्त करण्यात आल्याने वाहतूककोंडीला आळा बसला. ओझर येथील एकेरी मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची संख्या लक्षणीय होती. प्रत्येक गाडीला भगवा ध्वज लावलेला होता. जत्रा हॉटेलपासून आडगावच्या उड्डाणपुलापर्यंत मोर्चात सहभागी होणाऱ्या वाहनांच्या रांगा होत्या. काही काळानंतर वाहतूक धिम्या गतीनं पुढे सरकत होती. लोकांनी रस्त्यावर येऊन पुढे पायी जाण्याचा निर्णय घेतला. महामार्गावर प्रत्येक ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. अवजड वाहनांची वाहतूक दहाव्या मैलापासून पिंपरीकडे वळविण्यात आली. त्यामुळे संपूर्ण महामार्ग दुचाकी व चारचाकी, बसेस, टेम्पोने भरून गेला होता. योग्य नियोजनामुळे कुठेही अपघात झाला नाही. अतिशय शिस्तीने व वेग मर्यादेच्या नियमात प्रत्येक वाहन तपोवनाकडे कूच करत होते.
निफाड : तालुक्यातील पूर्व आणि उत्तर भागासह येवला व नांदगाव शहरासह तालुक्यातील सर्व गावांतील मराठा समाजबांधव चारचाकी, दुचाकी वाहनांद्वारे निफाडमार्गे नाशिककडे रवाना झाले. एक मराठा, लाख मराठा यासह इतर घोषणांनी नाशिक-औरंगाबाद महामार्ग दणाणला होता. निफाड तालुक्यातील सर्व रस्ते भगवेमय झाले होते. प्रत्येक वाहनाला भगवे झेंडे व स्टिकर लावलेले होते. परिसरातील समाजबांधवांना मोर्चात सहभागी होण्यासाठी चार चाकी वाहने, टेम्पो, ट्रक, रिक्षा, छोटा हत्ती, जीप आदिंसह विविध शैक्षणिक संस्थांच्या स्कूल बसेस, ट्रॅव्हल बसेस, परिवहन महामंडळाच्या बसेस आदि वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. काही समाजबांधव दुचाकीद्वारे नाशिककडे रवाना होताना दिसले.
मराठा बांधवांनी एक मराठा, लाख मराठा, जाणता राजा, आम्ही मराठे अशा विविध घोषणा लिहिलेले टी-शर्ट, तसेच मी मराठा असे छापलेल्या भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी आदि घोषणा देत गावागावांतील मराठा बांधव नाशिकच्या दिशेने येत होते.
नाशिक-औरंगाबाद महामार्ग, मुंबई-आग्रा महामार्ग आदिंसह नाशिककडे येणारे सर्व रस्ते वाहनांच्या गर्दीने फुलून गेले होते. नाशिक येथे जाणार्या मोर्चेकर्या साठी निफाड येथील शांतीनगर त्रिफुली येथे शांतीनगर मित्र मंडळ यांच्या वतीने पाण्याचे पाऊच मोफत वाटण्यात आले तसेच येवला येथील मराठा समाज बांधवांतर्फे मोर्चा साठी जाणार्या मोर्चे कर्या साठी मोफत पाण्याचे पाऊच निफाडच्या शांतीनगर त्रिफुली येथे वाटण्यात आले
चांदवड : नाशिक येथे शनिवारी (दि. २४) निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी चांदवड बंदची हाक देण्यात आली होती. येथे मोर्चेकरांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या. शहरातील सर्वच शाळा, महाविद्यालये, बॅँका व व्यापाऱ्यांनी ७५ टक्के व्यवहार बंद ठेवले होते. विविध भागांतून, गावागावांतून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव नाशिक येथील मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाले होते. प्रत्येक वाहनाला क्रांती मोर्चाचे स्टिकर, भगवा झेंडा होता. तर महामार्गावर दुतर्फा भगवे झेंडे लावण्यात आले होते. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या होत्या. पहाटेपासून भगवे झेंडे लावलेल्या गाड्या नाशिकच्या दिशेने जाताना दिसत होत्या.
 

Web Title: The roads in the district are called Bhagwam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.