रस्तादुरुस्तीचे काम सुरू
By Admin | Updated: August 12, 2016 22:12 IST2016-08-12T22:11:28+5:302016-08-12T22:12:13+5:30
प्रशासनाला आली जाग : आठ गावांचा संपर्क पुन्हा होणार

रस्तादुरुस्तीचे काम सुरू
वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सटाणा-तळवाडा हा रस्ता वटारजवळ गेल्या ११ जुलै रोजी झालेल्या पहिल्याच पावसात निम्मा वाहून गेल्याने एसटी बसेसही बंद करण्यात आल्या होत्या. गेल्या एक महिन्यापासून वटारपासून आठ गावांचा संपर्क तुटल्याने दळणवळणासाठी परिसरातील शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. स्थानिक नागरिकांनी वेळोेवेळी पाठपुरावा करूनही कामाला उशीर लागत होता. पण उशिरा का होईना प्रशासनाला मुहूर्त सापडला व रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
गेल्या तीस दिवसांपासून हा रस्ता खचला होता. कोणीही या रस्त्याकडे लक्ष देत नव्हते. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आल्याने या मार्गावरून जाणाऱ्या भाजीपाला गाड्या बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज सकाळी कामाला सुरुवात झाली असून, सायंकाळपर्यंत काम पूर्ण होईल, असे तेथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. जर काम इतके लवकर होणार होते तर इतक्या दिवस रस्ता बंद का ठेवला, असा प्रश्न तेथील नागरिकांना पडला आहे.
बागलाणचा पश्चिम पट्टा भाजीपाला पिकासाठी ओळखला जातो. बऱ्याच शेतकऱ्यांची कोबी, मिरची, टमाटे, कोथिंबीर हे भाजीपाला चालू आहेत. भाजीपाला काढण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. रस्त्याचे काम चालू बघून परिसरातील शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत असून, उशिरा का होईना; पण प्रशासनाला जाग आली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (वार्ताहर)