ंओतूर-आठंबे रस्ता बनला मृत्यूचा सापळा
By Admin | Updated: September 12, 2016 01:03 IST2016-09-12T01:01:23+5:302016-09-12T01:03:45+5:30
वाहनधारकांची कसरत : वेळोवेळी तात्पुरती स्वरूपाची डागडूजी

ंओतूर-आठंबे रस्ता बनला मृत्यूचा सापळा
अशोक देशमुख ओतूर
वेळ : सकाळी १० वाजेची.
स्थळ : ओतूर-आठंबे रस्ता.
कळवण तालुक्यातील ओतूर ते आठंबे या सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
२० वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. या रस्त्यावरील प्रवास जीवघेणा ठरू लागला आहे. दररोज या रस्त्यावरून परिसरातील शेतकरी, शाळकरी मुले, व्यावसायिक, नोकरदार वर्ग यांची वर्दळ असते. हा रस्ता दुरुस्त करण्याबाबत लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी मागणी केली असता तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली जाते. पुन्हा माती निघून जाते व पूर्ववत खड्डे पडतात. ओतूर परिसरातील जनतेला नांदुरी ते वणी येथे जाण्यासाठी पर्यायाने नाशिकला जाणेसाठीही हा जवळचा आणि सोयीचा मार्ग आहे.
या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. उजव्या आणि डाव्या बाजूच्या साइडपट्ट्या एक ते दीड फुटाने खचल्या आहेत. वाहनधारकास खड्डे टाळताना फार मोठी कसरत करावी लागते. सदर खड्डे वाचवण्याच्या नादात अनेक वेळा या रस्त्यावर लहान मोठे अपघात झाले आहेत. रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली शासनाचा निधी मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे. तरीही रस्त्याची दुर्दशा पूर्वीसारखीच. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी मैलबिगारी येऊन माती टाकतात. तेही ओतूर ते आठंबेपर्यंत टाकून खड्डे बुजविले जात नाही. कुठेतर अर्धा कि.मी.पर्यंत काम केले जाते बाकीचा रस्ता मात्र तसाच राहतो. याकडे संबंधित खाते दुर्लक्ष करीत असते. तसेच लोकप्रतिनिधीही या रस्त्याकडे फिरून पाहत नाहीत. याबाबत ओतूर परिसरातील ओतूर, कुंडाणे, शिरसमणी, भुसणी, नरूळ, मेहदर, कन्हेरवाडी येथील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ, लोकप्रतिनिधींना भेटून हा रस्ता दुरुस्त करण्याबाबत आपली कैफीयत लवकरच मांडणार आहे. (वार्ताहर)