गडावर दगड पडल्याने रस्ता बंद
By Admin | Updated: July 12, 2016 00:04 IST2016-07-11T23:55:47+5:302016-07-12T00:04:09+5:30
पाच ठिकाणी पडझड : कळवण तालुक्यात दोन म्हशी, दोन गायी वाहून गेल्या

गडावर दगड पडल्याने रस्ता बंद
कळवण : शहर व तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, गिरणा, तांबडी, बेहडी, मार्कडी, म्हश्याड या नद्यांना पूर आला आहे. गोळाखाल येथे पाण्याच्या ओढ्यात दोन म्हशीव दोन गायी वाहून गेल्या होत्या, परंतु तपासाअंती त्यांचा शोध लागला. रविवारी तालुक्यात २४० मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. सप्तशृंगगडावरील मंदिराच्या उतरीच्या मार्गावर दगड कोसळल्याने मार्ग बंद करण्यात आला आहे.
चणकापूरच्या लाभक्षेत्रात चार-पाच दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने पूरपाण्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे गिरणा नदीपात्रात पाणीचा विसर्ग करण्यात आला असून, गिरणा नदीला पूरपाणी आला आहे, तर चणकापूर उजव्या कालव्यात पूरपाणी सोडण्यात आले आहे. दळवट परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दळवट येथील तांबडी नदीच्या
पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने दळवट ते कोसुर्डे रस्त्याचा संपर्क तुटला आहे. संततधारेमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.
सप्तशृंगगडावर जाणाऱ्या पायऱ्यावर उतरतीच्या मार्गावर दगड कोसळल्याने उतरण्याचा मार्ग बदलण्यात आला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ब्रकरने दगड फोडण्याची व्यवस्था श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने केली आह,े अशी माहिती व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली. नांदुरी येथून सप्तशृंगगडावर जाण्यासाठी घाटातील मुख्य रस्त्यावर तुरळक दरड कोसळल्याने दगड पडले
असून, सार्वजनिक बांधकाम विभागाला वाहतुकीच्या मार्गावर वाहतुकीस निर्माण होईल हे
लक्षात घेऊन रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याच्या सूचना
तहसीलदार कैलास चांवडे यांनी दिल्या आहेत.
मौजे हिंगवे शिवारातील शिवार रस्ता मुसळधार पावसामुळे रविवारी पाण्यात वाहून गेला होता. सोमवारी तातडीने जेसीबीद्वारे लोकसहभागातून रस्ता पूर्ववत करण्यासाठी महसूल विभाग यंत्रणेने पाठपुरावा केला आहे. दळवट, अभोणा व कनाशी परिमंडळात सर्वाधिक पाऊस पडला असल्याने या भागात शेतीचे व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या तक्रारी
आदिवासी बांधवांनी केल्याने तहसीलदार कैलास चांवडे
यांनी या भागाचा दौरा केला असून, संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या आहेत. (वार्ताहर)