नोटबंदीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉँग्रेसचा सटाण्यात चक्का जाम
By Admin | Updated: January 10, 2017 00:49 IST2017-01-10T00:48:52+5:302017-01-10T00:49:55+5:30
नोटबंदीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉँग्रेसचा सटाण्यात चक्का जाम

नोटबंदीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉँग्रेसचा सटाण्यात चक्का जाम
सटाणा : नोटबंदीमुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेला होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ सोमवारी (दि. ९) राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील बसस्थानकासमोर चक्का जाम आंदोलन करून विंचूर-प्रकाशा मार्ग काही काळ रोखून धरण्यात आला.
शरद पवार यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोटबंदीविरोधात एल्गार पुकारला. दुपारी १२ वाजता शहरातील बसस्थानकाजवळ पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी आमदार संजय चव्हाण यांनी मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत ठिय्या दिला. यामुळे विंचूर-प्रकाशा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मोदी सरकारच्या या नोटबंदीमुळे देशात आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका करत भामरे म्हणाले की, या निर्णयामुळे आधीच दुष्काळाच्या फेऱ्यात सापडलेला शेतकरी देशोधडीला लागला आहे. कांदा, टमाटा कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.
जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, पंचायत समितीचे उपसभापती वसंत भामरे, संजय चव्हाण, संजय सोनवणे, ज. ल. पाटील आदिंची भाषणे झाली. आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार सुनील सौंदाणे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
आंदोलनात माजी नगराध्यक्ष विजय वाघ, पांडुरंग सोनवणे, दत्तू सोनवणे, संजय पवार, महेंद्र सोनवणे, केशव मांडवडे, जे. डी. पवार, फईम शेख, राकेश रौंदळ, दादू सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)