शहरातील रस्त्यांची चाळण
By Admin | Updated: August 9, 2015 22:38 IST2015-08-09T22:37:22+5:302015-08-09T22:38:11+5:30
रिमझिम पावसातच दैना : खड्डे बुजविण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष

शहरातील रस्त्यांची चाळण
नाशिक : शहरात अद्याप मुसळधार पावसाने हजेरी लावली नसली तरी, मागील काही दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी हजेरी लावत आहे. हलक्या पावसाच्या सरींमुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडून चाळण होण्यास सुरुवात झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हलक्या सरींनी जर रस्त्यांची दैना होत असेल तर मुसळधार पावसामध्ये ‘रस्त्यांत खड्डे की खड्ड्यांत रस्ते’ असेच काहीसे चित्र बघावयास मिळेल, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.
सध्यातरी शहरात जोरदार पाऊस होत नसला तरी बहुतांश रस्त्यांवर लहान-मोठ्या खड्डे पडलेले पहावयास मिळत आहे. यामुळे नाशिककरांची वाहने खिळखिळी होण्याबरोबरच पाठीच्या दुखण्याचादेखील त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मुंबई नाक्याकडून वडाळारोडकडे जाणारा रस्ता, नासर्डी नदी पुलापासून खोडेनगरकडे जाणारा पखालरोड, वडाळागावाकडे जाणारा रस्ता, वडाळा नाका, द्वारका चौफुली, इंदिरानगर-डीजीपीनगर कॅनॉल रस्ता, शरणपूररोड सिग्नल आदि रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
रस्त्यांवर पडलेले खड्डे, शहरातील विविध रस्ते दुभाजकांलगत साचलेला मातीचा ढीग व त्यामुळे रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे होणारा चिखलात वाहने घसरून होणाऱ्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. संततधार पाऊस सुरू नसला तरीदेखील पालिकेच्या बांधकाम विभागामार्फत अद्याप रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात
आहे. वातानुकूलित चारचाकीमधून शहरात वावरणाऱ्या पालिके चे अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीं विरुद्धही नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.(प्रतिनिधी)