राजीवनगर रस्त्यावर अपघातात वाढ
By Admin | Updated: January 7, 2017 01:07 IST2017-01-07T01:00:47+5:302017-01-07T01:07:17+5:30
दुर्लक्ष : रस्त्यावर खेळतात मुले

राजीवनगर रस्त्यावर अपघातात वाढ
इंदिरानगर : शंभर फुटी रस्त्यावर राजीवनगर झोपडपट्टीतील मुले रस्त्यावरच खेळत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार त्रस्त नागरिकांनी केली आहे. लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढून हमरीतुमरी होऊन हाणामाऱ्या होत आहेत.
मुंबई-आग्रा महामार्ग ते पुणे महामार्गास जवळचा मार्ग म्हणून राजीवनगर, कलानगर, वडाळागाव, डीजीपीनगर क्रमांक-१ चा मार्ग १०० फुटी रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. परंतु १०० फुटी रस्ता राजीवनगर झोपडपट्टीतील काही झोपड्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणास अडथळा ठरत होत्या. अखेर सिंहस्थापूर्वी मोठा पोलीस फाटा घेऊन सुमारे ७० अनधिकृत झोपड्या काढण्यात आल्या होत्या. रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु अतिक्रमण विभागाची पाठ फिरताच १०० फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या पदपथावर सुमारे ३० ते ४० अनधिकृत झोपड्या वसल्या आहेत.
त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथच राहिले नाही तसेच रस्त्यांवर दिवसागणिक वाढणाऱ्या अनधिकृत झोपड्या त्यामधील लहान-मुले रस्त्यांवरच खेळतात. त्यामुळे वाहनधारकांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे बनले आहे. लहान - मोठे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. (वार्ताहर)