रंगोत्सव : रहाडी, रेन डान्सची तरूणाईला भूरळ
By Admin | Updated: March 18, 2017 21:15 IST2017-03-18T21:15:14+5:302017-03-18T21:15:14+5:30
विविध रंगांची उधळण करत शहर परिसरात पारंपरिक पध्दतीने शुक्रवारी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

रंगोत्सव : रहाडी, रेन डान्सची तरूणाईला भूरळ
नाशिक : विविध रंगांची उधळण करत शहर परिसरात पारंपरिक पध्दतीने शुक्रवारी (दि. १७) रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्यावर्षी पाणी टंचाईचा फटका बसला होता. त्यापार्श्वभूमीवर यंदा कोणत्याही निर्बंधांशिवाय आबालवृध्दांनी रंगपंचमीचा मनसोक्त आनंद लुटला.
जुने नाशिक परिसरात यावर्षी जल्लोषात रंगपंचमी साजरी करण्यात आली. पेशवेकालीन परंपरा लाभलेल्या तसेच नाशिकच्या रंगपंचमीचे विशेष महत्त्व असलेल्या रहाडींमध्येही युवकांनी उड्या मारत मोठ्या जल्लोषात रंगपंचमी साजरी केली. यावर्षीच्या रंगपंचमीसाठी जुन्या तांबट लेनमधील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीने शोध लावलेली रहाडदेखील नाशिककरांसाठी खुली करून देण्यात आली आली होती. रहाडीमध्ये उड्या मारण्याबरोबरच शॉवर्सखाली रेनडान्स करत तरुणाई विविध चित्रपटांच्या गीतांवर थिरकत होती. पंचवटीतील शनी चौक, गोदाकाठावरील संत गाडगे महाराज पुलाजवळील दिल्ली दरवाजा परिसरातील तसेच जुन्या तांबट गल्लीतील रहाडींजवळ नागरिकांनी रंगपंचमी खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
अनेक सामाजिक संस्थांनी नैसर्गिक रंग खेळण्याच्या आवाहनला प्रतिसाद देत शहरातील विविध भागांमध्ये नैसर्गिक रंगांनी तर काही ठिकाणी कोरडे रंग लावत रंगपंचमी खेळण्यात आली. कॉलेजरोड आणि गंगापूररोड परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एकत्र येत एकमेकांवर रंगांची उधळण केली. सकाळच्या तुलनेत दुपारी दोन वाजेनंतर उत्सवाला रंग चढला आणि अनेकांची पावले रहाडीकडे वळाली यामुळे शहरात संध्याकाळच्या वेळेस दुचाकीस्वारांची गर्दी झाल्याने विविध भागात काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.