चार तालुक्यात दरडी कोसळण्याचा धोका
By Admin | Updated: May 22, 2016 00:39 IST2016-05-22T00:25:57+5:302016-05-22T00:39:28+5:30
आपत्ती व्यवस्थापन : जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मान्सूनपूर्व आढावा

चार तालुक्यात दरडी कोसळण्याचा धोका
नाशिक : यंदा पावसाळ्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा धोका लक्षात घेता, महापूर, दरड कोसळणे व भूस्खलन होण्याची ठिकाणे निश्चित करण्याचे व त्याला तोंड देण्यासाठी उपाययोजना तयार ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
शुक्रवारी सकाळी नियोजन भवन येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा व मान्सून तयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक (एनडीआरएफ)च्या पुणे येथील कमांडंट आलोक कुमार यांनी बचाव व मदत साहित्याचे प्रात्यक्षिकही सादर केले. पावसाळ्यात तशी परिस्थिती उद्भवलीच, तर या तालुक्यांच्या ठिकाणी बचाव व मदत कार्य तत्काळ उभे करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे तसेच साहित्य सज्ज ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी बाळकृष्णन राधाकृष्णन यांनी दिल्या. महापूर, भूस्खलन यासारख्या घटना घडू शकत असल्याने तत्पूर्वीच त्यांची ठिकाणे निश्चित करण्यात येऊन उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले. नदी, नाल्यांभोवतीची अतिक्रमणे दूर करणे, पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत खुले करणे, गाव पातळीवर बचाव व मदत पथक कार्यान्वित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.