विस्तीर्ण प्रभागात रिपाइंची दमछाक

By Admin | Updated: February 25, 2017 23:59 IST2017-02-25T23:59:02+5:302017-02-25T23:59:18+5:30

मतफुटीचा शाप कायम : संघटित होण्यापेक्षा आपसातच संघर्ष

Ripai's tiredness in the wider range | विस्तीर्ण प्रभागात रिपाइंची दमछाक

विस्तीर्ण प्रभागात रिपाइंची दमछाक

नाशिक : मर्यादित क्षेत्रात असलेले प्राबल्य आणि त्याच त्या मतांच्या भरवशावर राजकारण करणाऱ्या रिपाइं उमेदवारांना विस्तीर्ण अशा प्रभागात यश मिळविता आले नाही, असेच म्हणावे लागेल. समाज आणि राजकारण करताना कार्याचा कॅनव्हॉस समृद्ध करणे अपेक्षित असताना केवळ ठराविक चौकोनात अडकल्यामुळेच रिपाइंची यंदा वाताहत झाली आणि अवघ्या एका उमेदवाराच्या पदरात यश पडले.  रिपाइंला गाफील ठेवून भाजपाने ऐनवेळी वाऱ्यावर सोडल्याने रिपाइंला संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरता आले नाही. खरेतर हेच भाजपाचे षड्यंत्र होते, असा आरोप आता होऊ लागला आहे. पराभवाच्या नैराश्यातून रिपाइंकडून असे बोलले जात असले तरी त्यातून आता काहीच निष्पन्न होणार नाही आणि भाजपावर त्याचा किंचितसा परिणामही दिसणार नाही. राजकारणाच्या सारिपाटावर खरेतर रिपाइंच त्यामुळे कमजोर ठरून जाते. निवडणुका अशा कुणाच्या भरवशावर जिंकता येत नाहीत. त्यासाठी पक्षाचे ध्येयधोरण, उमेदवाराचे प्राबल्य आणि लोकभावनेला हात घालण्याचे राजकारण करता आले पाहिजे. जे भाजपाने केले.  रिपाइंने फक्त आठ उमेदवार मैदानात उतरविले होते. मागील पंचवार्षिकला रिपाइंच्या तीन नगरसेवकांना पालिकेत पोहचता आले. यंदा किमान पाच ते सहा उमेदवार तरी पोहचतील, असे रिपाइंकडून सांगण्यात येत होते. परंतु त्यांना भाजपाच्या मनसुब्याचा अंदाज घेता आला नाही आणि तेथेच रिपाइंच्या दुबळ्या राजकारणाचा प्रत्यय आला. भाजपाने नाकारल्यानंतर खरेतर रान पेटवून रिपाइं जनतेत तसा संदेश पोहचविण्याची रणनीती आखणे गरजेचे होते. त्यातून भाजपालाही धडा मिळाला असता, परंतु आपसात काहीतरी वस्तू वाटून घ्याव्यात त्याप्रमाणे ना मुलाखती ना चर्चा करता रिपाइंच्या नेत्यांनी उमेदवाऱ्या वाटून घेतल्या आणि हेच रिपाइंच्या पारंपरिक मतदारांना मान्य झाले नाही.
जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांना त्यांचे प्रभावक्षेत्र सोडून उमेदवारी करावी लागली आणि त्यांच्या बालेकिल्ल्यात सुनेला लढावे लागले. इतर सहा उमेदवारांना त्यांच्या-त्यांच्या भागातील वर्चस्व पाहून लढण्यास सांगण्यात आले, तर अनेक निवडणुकांप्रमाणेच रिपाइंचेच इतर अनेक कार्यकर्ते अपक्ष रिंगणात उतरले. म्हणजे मतविभागणीचा शाप कायम राहिला. दुसरीकडे प्रभावक्षेत्र नसल्याने काय होते याचा प्रत्यय लोंढे यांच्या पराभवावरून समोर आला. दुसरी बाब म्हणजे केवळ मी म्हणजेच पक्ष म्हणूनही चालत नाही, तर पक्षाचे ज्येष्ठ नेते, पॅनलचे पाठबळ तितकेच महत्त्वाचे ठरते. रिपाइंच्या पराभवाला हे सर्व घटक कारणीभूत ठरल्याने रिपाइंला आत्मपरीक्षण करून चालणार नाही, तर निवडणुकीतील रिपाइं पक्ष काय असतो हे दाखवून देण्यासाठी वेगळ्या संस्कृतीचीच गरज आहे. प्रभावक्षेत्रात यश मिळते हे दीक्षा लोंढे यांच्या विजयाने दिसून आलेही, पण रिपाइं पक्ष सोशल व्हावा याची जाणीव होणेही महत्त्वाचे आहे. आगामी काळात विस्तीर्ण राजकारणाची भाषा रिपाइंला शिकावी लागेल आणि पक्षशिस्तही आणावी लागेल हे मात्र नक्की.
१९९२ पासून माकपाचे प्रतिनिधी
1992 पासून प्रत्येक टर्मला महापालिकेत माकपाने प्रतिनिधित्व केले आहे. यंदा मात्र माकपाला महापालिका गाठता आली नाही. कामगार आणि कष्टकऱ्यांसाठी लढणाऱ्या माकपाने आत्तापर्यंत सिडको, सातपूर भागांतील कामगार वसातींमधूनच निवडणूक लढविली. यंदा त्यांना मोठ्या प्रभागरचनेमुळे इतर भागांतील मते मिळविण्यास अडचण आली. पैसेवाल्यांची निवडणूक झाली असे म्हणून माकपाने पराभव मान्य केला असला तरी मर्यादित क्षेत्रातील प्रभावाचा फटका त्यांना बसला हेही त्यांनी मान्य करायला हवे. माकपाकडे कार्यकर्ते भरपूर असले तरी नेत्यांचे चेहरे तेच ते आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणात परिचित चेहऱ्यांची जेथे दमछाक होते तेथे नवख्या उमेदवारांचे काय होत असेल याचाही विचार व्हायला हवा. माकपाचे जायभावे आणि वसुधा कराड हे दोघेही दुसऱ्या क्रमांकावर राहिले. इतर उमेदवार कसेबसे हजाराच्या घरात पोहचले. बदललेल्या राजकीय समीकरणात मतदारांना गृहित धरून चालणार नाही हे स्पष्ट असताना माकपाला नेमके तेच भोवले. मतांचे पॉकेट याव्यतिरिक्त त्यांचे प्रयत्न दिसलेच नाहीत.
११ पक्षांची पुरोगामी आघाडी
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अकरा पक्षांची मोट बांधून पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन झाली आणि २१ उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले. ज्यांना निवडणूक लढण्याची इच्छा होती त्यांची इच्छा आघाडीच्या झेंड्याखाली पूर्ण झाली असेच म्हणावे लागले.  पालिकेचा परंपरागत कारभार बदलून टाकण्यासाठी निवडणूक लढवित असल्याचे आघाडीकडून सांगण्यात आले असले तरी रणांगणात मात्र त्यांची एकसंध आघाडी दिसली नाही. उमेदवारावरच आघाडी विसंबून राहिली. आघाडीच्या दोन उमेदवारांना दोन हजार आणि त्याच्या जवळपास मते मिळाली. असे असले तरी आघाडी म्हणून ओळख निर्माण करण्याचा झंझावात आघाडीत दिसला नाही.  आघाडीचे प्रवर्तक डॉ. संजय अपरांती आघाडीच्या केंद्रस्थानी राहिले, परंतु निवडणुकीची यंत्रणा उभी करण्यात त्यांनी अपेक्षित यश मिळू शकले नाही.

Web Title: Ripai's tiredness in the wider range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.