उमराणे येथे विसर्जन मिरवणुकीत दंगल
By Admin | Updated: September 28, 2015 23:58 IST2015-09-28T23:57:13+5:302015-09-28T23:58:00+5:30
गालबोट : मिरवणूक पुढे नेण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची; हिंगणे देहरेत नाचण्यावरून वाद

उमराणे येथे विसर्जन मिरवणुकीत दंगल
उमराणे येथे विसर्जन मिरवणुकीत दंगलगालबोट : मिरवणूक पुढे नेण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची; हिंगणे देहरेत नाचण्यावरून वादउमराणे : येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मिरवणूक पुढे नेण्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाची रूपांतर दगडफेकीत झाले. यात पोलीस कर्मचाऱ्यांसह पाचजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
येथील इंदिरानगर भागात काकाज ग्रुप व पीव्हीडी ग्रुपतर्फे सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना केली होती. दोन मंडळांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान काकाज ग्रुप मंडळाची मिरवणूक शहीद स्मारकाजवळ आली. त्यानंतर मागून आलेल्या पीव्हीडी ग्रुपच्या मंडळाने मिरवणूक पुढे नेण्याची सूचना केली असता, दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर वादात झाल्याने परिसरात धुमश्चक्री उडाली. तसेच दगडफेकही करण्यात आली.
या घटनेचे गांभीर्य पाहून वरिष्ठांना कळविले असता, देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील टोणपे व त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्त्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यांवरही दगडफेक करण्यात आली.
दगडफेकीत पोलीस शिपाई दत्त गायकवाड, किरण पवार, होमगार्ड प्रवीण खरे, अनिल खैरनार जखमी झाले असून, मोठाभाऊ सुकदेव देवरे हा कार्यकर्ताही जखमी झाला. याप्रकरणी पोलीसांनी भरत देवरे, मोठाभाऊ देवरे, किरण देवरे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, शिवीगाळ करणे असे गुन्हे दाखल केले.
तर दुसऱ्या गुन्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांना प्रतिबंध करून धक्काबुक्की करणे, संगनमताने जमाव जमवून दगडफेक करून जखमी केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी गणेश मंडळाचे कार्यकर्ते अंबादास मांडवडे, राहुल जमधाडे, सुदाम मोरे, आबा देवरे, दीपक अहिरे, बबलू पवार, भरत देवरे, नितीन मांडवडे, किरण देवरे, सतीश देवरे, दीपक देवरे, योगेश देवरे, कैलास गोधडे, अनिल जाधव, मोठाभाऊ देवरे, बबलू सोनवणे यांच्यासह ३00 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील सोळा संशयित आरोपींना कळवण न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता के ली.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक संजय गुंजाळ, मालेगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
मध्यरात्रीनंतर संशयित आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधव केदार, हवालदार मोठाभाऊ जाधव, जमादार तानाजी ठाकरे तपास करीत आहेत. (वार्ताहर)
न्यायडोंगरीत हाणामारीत २७ जण जखमी
न्यायडोंगरी : गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान दोन गटांतील हाणामारीत होऊन २७ जण जखमी झाले. त्यातील माणिक बच्छाव, विजय बच्छाव, उल्हास बच्छाव, उत्तम बच्छाव,पप्पू बच्छाव, छगन बागुल हे सहा जण गंभीर असून, अधिक उपचारासाठी त्यांना मालेगाव येथे हलवण्यात आले आहे. या प्रकरण ९५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील १७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित संशयितांना ताब्यात घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, हिंगणे देहरे ( ता. नांदगाव ) येथे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परस्परांविरोधात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार राहुल मार्तंड बिऱ्हाडे यांनी आम्हास शिवीगाळ करून मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली, तर दिलीप नथू बच्छाव यांनी मिरवणुकीत नाचलो नाही म्हणून माझ्यावर व माझ्या घरातील सदस्यांवर जीवघेणा हल्ला केला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. हिंगणे देहरे येथे गणपती विसर्जन मिरवणूक निघाली होती मिरवणुकीत धोंडीराम बच्छाव, सुरेश बच्छाव, बापू सोनवणे, एकनाथ सोनवणे, दिलीप बच्छाव, त्र्यंबक बच्छाव, शिवाजी बच्छाव यांच्यात नाचण्यावरून शाब्दिक चकमक उडाली. यावेळी इतर काहीजणांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला होता. मात्र सोमवारी सकाळी या वादाची ठिणगी पडून या दोन्ही गटांत हाणामारीत झाली. या हाणामारीत कुऱ्हाड, कोयते, लाठ्या, काठ्या आदिंचा वापर होवून २७ जण जखमी झाले.त्यात सहा जण गंभीर जखमी असून पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आल्याचे समजते दरम्यान घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते .मनमाड येथील उपविभागीय अधिकारी डॉ . राहुल खाडे यांनी घटनास्थळी भेट देवून चौकशी केली.रात्री उशिरा पर्यंत हि चौकशी सुरु होती.या गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे हिंगणे देहरे गावात दिवसभर तणाव पूर्ण वातावरण असल्याने पोलीस ताफा मोठ्या प्रमाणात सज्ज आहे.