रिमझिमने खरिपाला फुटणार अंकुर
By Admin | Updated: July 25, 2014 00:37 IST2014-07-24T22:27:29+5:302014-07-25T00:37:32+5:30
दमदार हजेरी हवी : शेतकऱ्याच्या आशा पल्लवित

रिमझिमने खरिपाला फुटणार अंकुर
रेडगाव खुर्द : परिसरात पावसाळ्याची चार नक्षत्र कोरडी गेल्यानंतर पुष्य नक्षत्रात लांबलेल्या पावसाने रिमझिम स्वरूपात का होईना आज दिवसभर हजेरी लावली. त्यामुळे काही प्रमाणात विलंबित खरीप पेरणी शक्य होणार असल्याने हवालिदल झालेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या
आहेत.
परिसरात व तालुक्यात पावसाने दीर्घ ओढ दिल्याने तब्बल दीड महिना कोरडा गेला. अनुभवाच्या पलीकडे पावसाने ओढ दिल्यामुळे परिसरात भीषण चारा, पाण्याची टंचाई जाणवत आहे. शेकडो हेक्टरवरील टमाट्याची लागवड वाया गेली. अनेकांनी रोपे फेकून दिली. गत आठवडाअखेर एक टक्काही पेरणी झाली नाही. किमान आषाढीला पाऊस येईल या जनमानसाच्या अपेक्षाही फोल ठरल्या. मात्र पुनर्वसू नक्षत्राच्या दोन दिवसांत पावसाने डोंगर किनार पट्टीलगत अधून मधून हलक्या सरीने हजेरी लावली होती. त्यावर त्या भागात मशागत करून पेरणीची तयारी केली, तर अनेकांनी पेरणीदेखील केली आहे, परंतु रेडगाव परिसरात व दक्षिण पूर्वभागात पावसाने ओढ दिलेली होती. येथे मशागत करण्यापासून कामे ठप्प असल्याने शेतकरी हवालिदल होता.
तालुक्यासह परिसरातील सर्व गावात पुष्य नक्षत्राच्या पावसाने रिमझिम स्वरूपात का होईना हजेरी लावली आहे. पावसाने शंभर टक्के पेरणी शक्य नसली तरी काही प्रमाणात घाईगर्दीने मशागत करून लांबलेली खरिपाची पेरणी करणे शक्य होणार आहे. पावसाचे चित्र समाधानकारक नाही, परंतु एकदम कोरडेठाक राहण्यापेक्षा हेही नसे थोडके या न्यायाने रिमझिम पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.
खरिपातील सोयाबीन, भुईमूग, मका यांच्या पेरणीची वेळ गेली असल्याने त्यांच्या क्षेत्रात मोठी घट होऊन यावर्षी बाजरीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. दुष्काळाचे सावट दूर होण्यासाठी शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत कायम आहे. (वार्ताहर)