ज्येष्ठांसह नवमतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
By Admin | Updated: February 22, 2017 01:17 IST2017-02-22T01:16:56+5:302017-02-22T01:17:08+5:30
पंचवटी विभाग : मतदानाचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट

ज्येष्ठांसह नवमतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
पंचवटी : महापालिका निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी पंचवटी विभागातील विविध ठिकाणच्या मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसह पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच मतदानाची संधी प्राप्त झालेल्या नवमतदारांनी मतदान केल्यानंतर मतदान केंद्राबाहेर पडताच स्वत:ची छबी मोबाइलमध्ये काढून ती सोशल मीडियावर पोस्ट करून मी मतदान केले, तुम्हीदेखील मतदान करा, असा संदेश प्रसारित केला. मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक येत होते, परंतु काहींना खोली क्रमांक सापडत नसल्याने त्यांना धावपळ करावी लागली. काही ज्येष्ठ नागरिकांनी तर मतदान खोल्या सापडत नसल्याने मतदान केंद्राबाहेरच्या परिसरात ठिय्या मांडला होता, तर काहींनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घेतल्याने पोलिसांनीच त्यांना मतदान खोल्या दाखविल्या. मतदान केंद्रापासून काही अंतरावर उमेदवारांच्या समर्थकांनी बुथ लावलेले होते, या बुथवरही काही मतदारांची नावे सापडत नसल्याची तक्रार ज्येष्ठांनी केली, तर ज्यांची नावे सापडली त्यांनी मतदान केले. मात्र वारंवार यादी चाळूनही नावे सापडत नसल्याने अनेकांनी घरचा मार्ग पकडला. यंदा महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळालेल्या नव मतदारांनी मित्रांसमवेत मतदान करून मित्रांबरोबरचे सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केले. (वार्ताहर)