बरोबर एक वर्षापूर्वी...!
By Admin | Updated: March 9, 2017 02:10 IST2017-03-09T02:10:14+5:302017-03-09T02:10:26+5:30
नाशिक : बरोबर एक वर्षापूर्वी नाशिककरांना पाणीकपातीच्या कटू निर्णयाला सामोरे जावे लागले होते.

बरोबर एक वर्षापूर्वी...!
नाशिक : बरोबर एक वर्षापूर्वी नाशिककरांना पाणीकपातीच्या कटू निर्णयाला सामोरे जावे लागले होते. यंदा गंगापूर धरणात जुलै २०१७ अखेर पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याने नाशिककरांना पाणीकपात सोसावी लागणार नाही. मात्र, यंदा विलंबाने होणारे मान्सूनचे भाकीत पाहता पाणी वापराबाबत काटकसर करावी लागणार आहे.
वर्षभरापूर्वी, महापालिकेत पाणीप्रश्नी रणकंदन माजले होते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात घट झालेली होती. महापालिकेने एकवेळ पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला होताच, परंतु पाणीसाठ्याचा जपून वापर करण्यासाठी आणखी पाणीकपात करण्याचा दबाव प्रशासनावर वाढत चालला होता. त्यातून राजकारणही झाले आणि भाजपा विरुद्ध अन्य पक्ष असा सामना बघायला मिळाला होता. एकूणच धरणातील पाण्याची स्थिती लक्षात घेऊन त्यावेळी प्रशासनाने दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेतला होता. त्यानुसार, त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. यंदा मात्र चित्र पालटले आहे. गंगापूर धरणात ५९ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याने यंदा पाणीकपातीचा सामना नाशिककरांना करावा लागणार नाही. परंतु, वेधशाळांचे वर्तविण्यात येत असलेले भाकीत पाहता मान्सूनला विलंब होणार असल्याने नाशिककरांना पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करावा लागणार
आहे. (प्रतिनिधी)