रोहयोच्या कामगारांची वाढली १३ रुपयांनी मजुरी शासनाचे परिपत्रक
By Admin | Updated: April 18, 2015 00:41 IST2015-04-18T00:41:27+5:302015-04-18T00:41:52+5:30
रोहयोच्या कामगारांची वाढली १३ रुपयांनी मजुरी शासनाचे परिपत्रक

रोहयोच्या कामगारांची वाढली १३ रुपयांनी मजुरी शासनाचे परिपत्रक
नाशिक : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरीचे दर हे महाराष्ट्रासाठी १६८ वरून १३ रुपयांनी वाढून हे दर नव्याने १८१ रुपये करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने १० एप्रिल २०१५ रोजी परिपत्रक काढले असून, त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरीचे दर हे महाराष्ट्र रोजगार हमी कायदा १९७७ मधील कलम ७(२) नुसार निश्चित केले जातात. भारत सरकारने केंद्रीय कायदा अन्वये निश्चित केलेल्या मजुरीचे दर हे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजुरांनादेखील लागू होतात. त्यानुसार केंद्र शासनाच्या ३१ मार्च २०१५ च्या अधिसूचनेनुसार १ एप्रिल २०१५ पासून महाराष्ट्रासाठीचा मजुरीचा दर १८१ रुपये प्रतिदिन करण्यात येत आहे. त्या आधारे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेकरिता मजुरीचे दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पूर्वीचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर कार्यरत असलेल्या मजुरांना दैनंदिन हजेरी पटावरील १६८ रुपयांच्या दराऐवजी १ एप्रिल २०१५ पासून सुधारित दरपत्रकानुसार १८१ रुपये प्रतिदिन देण्यात यावे. तसेच मागील रोजंदारीचा कोणताही फरक देण्यात येऊ नये, असेही पत्रकात म्हटले आहे. शासन निर्णयानुसार आता ग्रामपंचायत विभागाने सर्व गटविकास अधिकारी यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजुरांना सुधारित दरपत्रकानुसार १८१ रुपये प्रतिदिन देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोेमवंशी यांनी दिली.(प्रतिनिधी)