पालक सचिवांकडून सिंहस्थ कामांचा आढावा
By Admin | Updated: November 20, 2014 00:33 IST2014-11-20T00:33:59+5:302014-11-20T00:33:59+5:30
पालक सचिवांकडून सिंहस्थ कामांचा आढावा
पालक सचिवांकडून सिंहस्थ कामांचा आढावा
नाशिक : येत्या मंगळवारी राज्याच्या मुख्य सचिवांच्या उपस्थितीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या उच्चाधिकार समितीच्या तयारीचा भाग म्हणून नाशिक दौऱ्यावर आलेले नगरविकास प्रधान सचिव तथा जिल्ह्णाचे पालक सचिव श्रीकांत सिंह यांनी कुंभमेळा अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यात नाशिक महापालिकेने कामांसाठी निधीची मागणी केली.
राज्यात नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर प्रशासकीय पातळीवर पहिल्यांदाच मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत शासनस्तरावर प्रलंबित असलेले काही प्रश्न असतील तर ते मांडण्याची पूर्वतयारी म्हणून श्रीकांत सिंह यांनी माहिती जाणून घेतली. साधुग्रामच्या जागेच्या अधिग्रहणाबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याबाबतही त्यांनी माहिती घेऊन येत्या आठवडाभरात न्यायालयासमोर बाजू मांडण्याबाबत सूचना केली, तर पोलीस दलाकडून अद्यापही सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत निर्णय होत नसल्याने उच्चाधिकार समितीच्या बैठकीत गृह खात्याचे लक्ष वेधण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीत नाशिक महापालिकेने सिंहस्थ कामांसाठी राज्य शासनाने उर्वरित निधी तत्काळ देण्याची मागणी केली व महापालिकेची आर्थिक स्थिती विशद केली. मुख्य सचिवांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीसाठी सर्व विभागांनी आपली तयारी पूर्ण करावी, अशी सूचना सिंह यांनी केली. (प्रतिनिधी)