नवरात्रोत्सवानिमित्त आढावा बैठक

By Admin | Updated: October 4, 2015 23:23 IST2015-10-04T23:21:36+5:302015-10-04T23:23:09+5:30

सप्तश्रृंगगड : नियोजनासाठी जबाबदारीचे वाटप

Review meeting for Navratri | नवरात्रोत्सवानिमित्त आढावा बैठक

नवरात्रोत्सवानिमित्त आढावा बैठक

सप्तशृंगगड : उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत आदिमाया स्वयंभू सप्तशृंगी देवीचा नवरात्रोत्सव १३ आॅक्टोबरपासून सुरू होत असून, उत्सवाच्या दृष्टीने कळवण येथील प्रांत नीलेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय व निमशासकीय विभागांची यात्रा नियोजन आराखडा आढावा बैठक ट्रस्टच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी कळवणचे तहसीलदार अनिल पुरे, नव्यानेच रुजू झालेले माजी प्राचार्य व ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत विविध विभागांनी यात्रा कालावधीत आपली जबाबदारी चोख पार पाडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. चोख बंदोबस्तात नवरात्रोत्सव पार पाडण्यात येणार आहे. भगवतीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी खास सोय करण्यात येणार असून, मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, दहा ते बारा लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील, असा अंदाज प्रशासनाच्या वतीने व्यक्त केला जात आहे. यात्रा कालावधीत नांदूरी येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात्रोत्सव कालावधीत सप्तशृंगगडावर खासजी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, तर गावातील वाहनांना पासेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी ८० कंत्राटी कामगारांची नेमणूक ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये टीसीएल टाकून जलशुद्धिकरण करण्यात येणार आहे.
तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहे. गावातील सर्व पथदीपांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवादरम्यान नाशिक जिल्हा परिषद व पंचायत समिती, कळवण व आरोग्य विभागाच्या वतीने सप्तशृंग नांदूरी येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या वैद्यकीय सेवेसाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, परिचर, तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांसाठी ट्रस्ट व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्याकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सप्तशृंग निवासिनी देवीचा नवरात्रोत्सव यात्रा कालावधीत ट्रस्टतर्फे भगवती मंदिर, सभामंडप, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य, महाप्रसाद, तसेच परिसर बंदोबस्त, साफसफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने नारळ फोडण्यास पहिल्या पायरीजवळ पाच मशीन्सची सोय करण्यात आली आहे. प्रदक्षिणा मार्ग यात्राकाळात बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे २४ तास कर्मचारी कार्यरत राहणार आहे. यात्रा कालावधीत भारनियमनही बंद ठेवण्यात येणार आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नांदुरी व सप्तशृंगगड येथे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, महिला पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी, महिला-पुरुष होमगार्ड, नागरिक संरक्षण दल, ग्रामसुरक्षा दल, अग्निशमन दल आदिंचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.यावेळी सरपंच सुमन सूर्यवंशी, उपसरपंच गिरीश गवळी, पोलीस निरीक्षक मधुकर गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गुंजाळ, संदीप बेनके, ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी, गणेश बर्डे, पोलीसपाटील शशिकांत बेनके आदि अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Review meeting for Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.