वैभवाचा त्याग करून पत्करले वैराग्य!
By Admin | Updated: August 1, 2015 23:49 IST2015-08-01T23:48:42+5:302015-08-01T23:49:26+5:30
वैभवाचा त्याग करून पत्करले वैराग्य!

वैभवाचा त्याग करून पत्करले वैराग्य!
नाशिक : मनुष्याचे जीवन ही जन्मापासून मृत्यूपर्यंत निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यात सुख, दु:ख, संकट, आनंद, आजार आदि गोष्टी येतात. सुखाने माणसाची उमेद वाढते, तर दु:खाच्या क्षणी तो कोलमडून पडतो. तरीही नवीन उभारी घेऊन मार्ग काढतो. कधी अचानक अशी घटना घडते की, त्याचे आयुष्य बदलून जाते. अत्यंत वैभवात वावरणारा माणूस या सर्व सुखांचा त्याग करून वैराग्य पत्करतो.
साधुग्रामचा फेरफटका मारला असता अशीही काही माणसे भेटतात. असाच एक अवलिया बाबा म्हणजे दिग्विजय महाराज होय. अत्यंत उच्चविभूषित म्हणजे पीएच.डी. केलेल्या एखाद्या माणसाने विद्यापीठात किंवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ज्ञान दानाचे कार्य करण्याऐवजी एखाद्या आश्रमाचा मार्ग धरून दाढी वाढवावी आणि साधू बनावे हे पाहून कुणालाही आश्चर्यच वाटेल. विशेष म्हणजे एका राजघराण्याचा वारसा लाभलेल्या माणसाने सर्व ऐश्वर्याचा त्याग करावा हे ऐकून धक्काच बसू शकतो. परंतु दिग्विजय महाराज यांच्याबाबत ही गोष्ट घडली आहे. साधुग्राममधील अखिल भारतीय दिगंबर आखाड्यात दाखल झालेले दिग्विजय महाराज सांगतात की, बिहार राज्यातील म्हणजे तत्कालीन मगध प्रांतातील सूर्यपुरा नगरी हे आमचे गाव. राजा राधिकारमण हे आमचे पणजोबा. या प्रांताचे राजे होते. पिढीजात श्रीमंती असल्याने काहीही कमतरता नव्हती. आम्ही चार भावंडे. त्यापैकी मी सर्वात मोठा होतो. आमचे बालपण सुखात गेले. शिक्षण सुरू होते. मला सर्व विषयांची आवड होती. वाचनाचा खूप नाद होता. मगध विद्यापीठातून हिंदी विषयाची पीएच.डी. ची पदवी घेतली. परंतु दरम्यानच्या काळात माझ्या तिन्ही भांवडांचे निधन झाले. अतिव दु:खाने व्याकूळ झालो. काय करावे सुचेना. जगण्याची इच्छा उरली नाही म्हणून एका पहाडावर गेलो. तेथील उंच कड्यावरून उडी मारली, तरी जिवंत राहिलो. साक्षात रामभक्त हनुमंतांनी (महाराजांनी) माझा जीव वाचविला. त्यामुळे ठरविले की, यापुढे सर्व आयुष्य हे धर्मकार्यासाठी खर्च करायचे आणि जीवनाला एक वेगळीच दिशा मिळाली. अनेक आश्रमांत गेलो, रानावनात फिरलो, धर्म-अध्यात्माचा अभ्यास केला. आता लोकांना धर्म आणि अध्यात्म समजावून सांगत आहे, असेही महाराज म्हणाले.