महसूल कर्मचाऱ्यांचे ‘फिटनेस’ आॅडिट
By Admin | Updated: July 30, 2014 00:19 IST2014-07-29T22:38:40+5:302014-07-30T00:19:31+5:30
!कर्मचाऱ्यांचा गोपनीय अहवाल होणार तयार

महसूल कर्मचाऱ्यांचे ‘फिटनेस’ आॅडिट
नाशिक : वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या कामाची उपयुक्तता तपासून ‘अनफिट’ कर्मचाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखविण्याचा विभागीय आयुक्तांनी दिलेल्या इशाऱ्याचा आधार घेऊन महसूल विभागाने पन्नाशी पार केलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांचे गोपनीय शेरे अहवाल तपासण्याबरोबरच खातेप्रमुखांचे मतही जाणून घेण्यात येणार आहे.
गेल्या महिन्यात विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची बैठक
घेतली. (पान ७ वर)
त्यात कामकाजाचा आढावा घेतला असता, त्यावेळी अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांच्याही कार्यक्षमता तपासून पाहण्याच्या सूचना केल्या होत्या. शारीरिक व मानसिकदृष्ट्या क्षमता खचलेल्या कर्मचाऱ्यांचा आढावा घेऊन त्यांना फिटनेस दाखविण्याची एकदा संधी देणे व त्यानंतर त्यांची सेवा समाप्त करण्यात यावी, असे आदेशही आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने आता प्रत्येक कर्मचाऱ्याचे गोपनीय अहवाल तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यात कर्मचाऱ्याने आजवर केलेली सेवा, त्यात त्याने सिद्ध केलेली गुणवत्ता, रजेचे प्रमाण, वैद्यकीय रजा सवलत, सहकाऱ्यांशी व वरिष्ठांशी असलेली वर्तणूक या बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी आजवर वैद्यकीय रजा घेतल्या असतील त्यांना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून फिटनेस प्रमाणपत्र आणावे लागेल. त्याचबरोबर जिल्हा शासकीय रुग्णालयातूनही तपासणी करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या पातळीवर ही तयारी केली जात असताना दुसरीकडे प्रत्येक खातेप्रमुखालाही त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गुणवत्ता, कार्यक्षमतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. खातेप्रमुखाने आपल्या शिफारशीसह कर्मचाऱ्याबाबतचा गोपनीय प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावयाचे आहेत. ज्या कर्मचाऱ्यांबाबत प्रतिकूल अहवाल प्राप्त झाला, त्याला म्हणणे मांडण्याची एकदा संधी देऊन त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.