जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या

By Admin | Updated: September 15, 2015 23:52 IST2015-09-15T23:52:18+5:302015-09-15T23:52:42+5:30

खेडकर निवासी उपजिल्हाधिकारी

Revenue administration transfers in the district | जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या

जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : पाच महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या करण्यात आल्या असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांची नाशिकच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या बदल्यांकडे महसूल यंत्रणेचे लक्ष लागून होते. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या बदल्या यंदा पाच महिने लांबणीवर पडल्याने बदलीपात्र व बदलीच्छुक हवालदिल झाले होते, तर राज्यात जवळपास तीसहून अधिक उपजिल्हाधिकारी नेमणुकीविना बसून होते. अखेर सोमवारी रात्री यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले. नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांची धुळ्याच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारीपदी बदली झाली, तर निवासी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) नीलेश जाधव यांची कळवणचे प्रांत अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. जाधव यांच्या जागी मुंबईहून नितीन मुंडावरे यांची बदली झाली आहे.
नाशिकच्या भूसंपादन अधिकाऱ्यांच्या रिक्त असलेल्या जागांवरही नवीन नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यात धुळ्याचे प्रांत अधिकारी विठ्ठल सोनवणे, नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले उपजिल्हाधिकारी रमेश काळे, श्रीमती सुरेखा चव्हाण यांचा समावेश आहे. खेडकर यांच्या जागी धुळ्याच्या विशेष भूसंपादन अधिकारी श्रीमती हेमांगी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांची नाशिकला मुद्रांक उपमहानिरीक्षक या जागेवर बदली करण्यात आली आहे.
बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा पार पडल्यानंतरच कार्यमुक्ती देण्यात याव्यात, अशा सूचनाही शासनाने विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Revenue administration transfers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.