पीककर्जाचे धनादेश न वटताच परत
By Admin | Updated: September 7, 2016 01:17 IST2016-09-07T01:17:32+5:302016-09-07T01:17:55+5:30
शेतकरी हवालदिल : जिल्हा बॅँकेचे कानावर हात

पीककर्जाचे धनादेश न वटताच परत
नाशिक : चार महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या पीककर्जाचे धनादेश कसेबसे हाती पडलेल्या शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम घेण्यासाठी बँकेत धनादेश वटण्यासाठी टाकले असता, जिल्हा बॅँकेत पैसे शिल्लक नसल्याचे कारण देऊन त्यांना पिटाळून लावण्यात आले. शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधकांकडे धाव घेऊन आपली व्यथा मांडली, तथापि, आश्वासनापलीकडे त्यांच्या पदरी काहीच पडले नाही.
निफाड तालुक्यातील चांदोरी येथील जवळपास पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनी मार्च-एप्रिल महिन्यातच चांदोरी विविध कार्यकारी सोसायटीमार्फत जिल्हा बॅँकेकडून पीक कर्ज मंजूर करून घेतले असून, साधारणत: एक ते दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बॅँकेने मंजूरही करून ठेवले व त्यातील २५ टक्के रक्कम आगावू शेतकऱ्यांच्या हातातही टेकविली, त्यामोबदल्यात शेतकऱ्यांच्या जमिनीही तारण ठेवून घेतल्या. दरम्यान, सप्टेंबर महिना सुरू झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी बागांची छाटणी व त्यानंतर खत टाकण्याची तयारी सुरू करून त्यासाठी जिल्हा बॅँकेने मंजूर केलेल्या कर्जाची मागणी करण्यास सुरुवात केली असता, प्रारंभी सोसायटीने धनादेश देण्यास नकार दिला. जवळपास महिनाभर शेतकऱ्यांनी सोसायटीचे उंबरठे झिजविल्यानंतर दोन दिवसांपूर्वी गावातील सुमारे पाचशे शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेचे धनादेश वितरीत करण्यात आले, त्यामुळे खुषित असलेल्या शेतकऱ्यांनी धनादेश वटण्यासाठी जिल्हा बॅँकेच्या शाखेत टाकले असता, बॅँकेकडे पैसेच शिल्लक नसल्याचे कारण देत त्यांचे धनादेश परत करण्यात आले. विशेष म्हणजे चांदोरी सोसायटीने गेल्या मार्चमध्येच जिल्हा बॅँकेच्या संपूर्ण कर्जाची परतफेड केली असून, गेल्या पंचवीस वर्षांपासून शेतकरी दरवर्षी बॅँकेकडून कर्ज घेत असताना यंदा मात्र बॅँकेने नकार दिल्याने शेतकरी हवालदिल झाले. त्यांनी थेट जिल्हा बॅँकेत धाव घेऊन बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांची भेट घेऊन व्यथा मांडली, परंतु दराडे यांनी पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केली. बॅँकेला शासनाकडून पैसे मिळाले नाहीत, आम्ही कुठून द्यायचे असा उलट सवालच त्यांनी शेतकऱ्यांना केला. त्यावर कर्ज मिळाले नाही, तर शेतकरी देशोधडीला लागून आत्महत्त्या करतील, असे शेतकऱ्यांनी सांगितल्यावर दराडे यांनी त्यात रस दाखविला नाही, अशी माहिती सुरेश भोज यांनी दिली. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कुऱ्हे यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी तक्रार अर्ज द्या, चौकशी करतो असे सांगून बोळवण केल्यावर अखेर संताप अनावर झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले, परंतु जिल्हाधिकारीही बैठकीत व्यस्त होते.