रोख रकमेसह पुरस्कार घेणार परत

By Admin | Updated: December 8, 2015 23:28 IST2015-12-08T23:27:57+5:302015-12-08T23:28:27+5:30

निर्मलग्राम पुरस्कार : मुदतीत झाले नाही हगणदारीमुक्त गाव

Returning the cash back with cash | रोख रकमेसह पुरस्कार घेणार परत

रोख रकमेसह पुरस्कार घेणार परत

नाशिक : गेल्या दशकभरापासून निर्मलग्राम पुरस्कार लाभलेल्या व त्या अनुषंगाने लाखो रुपयांचे पुरस्कार स्वीकारूनही, केंद्र शासनाने दिलेल्या अंतिम मुदतीत शंभर टक्के हगणदारीमुक्त गाव न केलेल्या ग्रामपंचायतींचे पुरस्कार परत घेतले जाणार असल्याचे वृत्त आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील १०७ ग्रामपंचायतींकडून निर्मलग्राम पुरस्काराची रक्कम परत घेण्याबरोबरच संबंधित गावचा निर्मलग्राम पुरस्कार काढून घेण्यात येणार असल्याने या १०७ ग्रामपंचायतींच्या विद्यमान सरपंच व ग्रामसेवकांवर पुरस्कार व पुरस्काराची रक्कम परत देण्याची नामुष्की ओढवणार आहे. जिल्ह्यात २००२-०३ पासून आजपर्यंत २२७ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम हगणदारीमुक्त पुरस्कार लाभला आहे. या पुरस्कारापोटी अनुक्रमे ५, ३ व २ लाखांची रक्कमही संबंधित ग्रामपंचायतींना गावच्या विकासासाठी देण्यात आली आहे. मात्र केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियानाच्या एका पथकाने केलेल्या पाहणीत कागदावर जरी शंभर टक्के हगणदारीमुक्त गावे दिसत असली तरी प्रत्यक्षात ती गावे श्ांभर टक्के हगणदारीमुक्त नसल्याचे आढळले होते. त्यानुसार केंद्र सरकारने जून २०१५ मध्येच राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या ग्रामस्वच्छता अभियान कार्यालयांना लेखी सूचना देऊन निर्मलग्राम पुरस्कार मिळालेली गावे २ आॅक्टोबर २०१५ पर्यंत शंभर टक्के हगणदारीमुक्त (ओपन डिफेसेटिव्ही फ्री व्हिलेज-ओडीएफ) करावीत अन्यथा संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आलेला निर्मलग्राम पुरस्कार आणि पुरस्कारापोटी दिलेली रक्कम परत घेण्यात येईल, असे कळविले होते.
त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना कळवून गाव शंभर टक्के हगणदारीमुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दिलेल्या कालावधीत २२७ पैकी केवळ १२० गावे शंभर टक्के हगणदारीमुक्त झाली. उर्वरित १०७ ग्रामपंचायतींचे निर्मलग्राम पुरस्कार व पुरस्काराची रक्कम आता परत घेण्याची कार्यवाही विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Returning the cash back with cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.