जप्त केलेली खुर्ची आणली परत

By Admin | Updated: April 28, 2016 00:18 IST2016-04-28T00:16:21+5:302016-04-28T00:18:24+5:30

कार्यकारी अभियंत्याचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

Return the recovered chair | जप्त केलेली खुर्ची आणली परत

जप्त केलेली खुर्ची आणली परत

नाशिक : भूसंपादनाचा मोबदला न दिल्याने जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याची जप्त करण्यात आलेली खुर्ची २४ तास उलटत नाही तोच, कार्यकारी अभियंत्यांनी स्वत: न्यायालयात हजर राहून प्रतिज्ञापत्र सादर केल्याने न्यायालयाने खुर्चीसह टेबल, कपाट व संगणक परत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार हे सर्व साहित्य पुन्हा जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागात परत नेण्यात आल्या.
जिल्हा परिषदेच्या वतीने अ‍ॅड. श्रीमती एस. एस. भुसे यांच्यासह कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरचे न्या. भागवत यांच्यासमोर युक्तिवाद मांडला. त्यात कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी संगणकात भूसंपादनाची सर्व माहिती असल्याने आणि टेबल-खुचीमुळे अडचण होत असल्याचे सांगितले. तसेच यासंदर्भात आपल्याला थोडा कालावधी दिल्यास आपण शासन स्तरावर पाठपुरावा करून संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देऊ, असे लेखी प्रतिज्ञापत्रही सादर केले. त्यामुळे न्या. भागवत यांनी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची जप्त केलेली खुर्ची, संगणक, टेबल व कपाटे परत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार हे सामान स्वत: कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी वरिष्ठ लिपिक अशोक शेवाळे, आरेखक गणेश गांगुर्डे यांच्या मदतीने जिल्हा परिषदेत एका खासगी वाहनाने परत आणले. योगायोगाने कालच गांगुर्डे यांचा वाढदिवस असल्याने पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करीत त्याचदिवशी जप्त केलेली खुर्ची परत मिळाल्याने समाधान व्यक्त केले. शासन स्तरावरून या शेतकऱ्यांचा वाढीव मोबदला लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत आपले प्रयत्न राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Return the recovered chair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.