Nashik Accident: अमृतधाम-तारवालानगर लिंक रोडवरून दुचाकीने प्रवास करताना रस्त्यातील खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकी खड्ड्यात आदळली. यावेळी दुचाकीचालक सेवानिवृत्त शिक्षक दिनकर पांडुरंग झेटे (६१) हे खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा रविवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नाशिक शहरासह पंचवटी, मेरी-म्हसरुळ, कोणार्कनगर, रासबिहारी लिंक रोड, अमृतधाम भागातील रस्त्यांची अक्षरक्षःचाळण झाली आहे. शनिवारी झेटे हे दुचाकीने घराच्या दिशेने प्रवास करत होते. यावेळी रस्त्यावरील खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात एका खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली. यामुळे त्यांचा तोल गेला अन् ते रस्त्यावर कोसळून गंभीररीत्या जखमी झाले होते. या अपघाताला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप झेटे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. झेटे येवला तालुक्यातील श्री वीरभद्र माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक होते.
प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत
तारवालानगर ते अमृतधाम लिंक रोडवर पावसाळा सुरू होण्याअगोदरपासून खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे बुजविण्याबाबत वारंवार मनपाकडे लेखी तक्रारी नागरिकांसह लोकप्रतिनिधींनीसुद्धा केल्या आहेत; मात्र मनपा प्रशासनाने याबाबत कुठलेही गांभीर्य दाखविले नाही, परिणामी एका सेवानिवृत्त शिक्षकाचा बळी गेला, असे या भागातील नागरिकांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाकडे वारंवार रस्त्याच्या दुर्दशेबाबत तक्रारी केल्या आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत. यामुळे एका दुचाकीचालकाला आपले प्राण गमवावे लागले. या भागातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने न बुजविल्यास रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा माजी नगरसेवक पूनम मोगरे यांनी दिला.