सेवानिवृत्तांची पेन्शन आॅनलाइन

By Admin | Updated: June 8, 2014 00:07 IST2014-06-07T23:05:50+5:302014-06-08T00:07:46+5:30

महिन्याच्या पहिल्या दिवशीच सेवानिवृत्तांच्या हाती रक्कम पडणार आहे.

Retired Pensioners Online | सेवानिवृत्तांची पेन्शन आॅनलाइन

सेवानिवृत्तांची पेन्शन आॅनलाइन

 

नाशिक : सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या दरमहा पेन्शनची रक्कम आता चालू महिन्यापासून ‘आॅनलाइन’ अदा करण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळे बॅँकांवरचा ताण कमी होण्याबरोबरच, महिन्याच्या पहिल्या दिवशीच सेवानिवृत्तांच्या हाती रक्कम पडणार आहे.
सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची रक्कम यापूर्वी पेन्शनधारकांचे खाते असलेल्या त्या-त्या बॅँकेच्या शाखेत लेखाकोष विभागाकडून धनादेशाद्वारे अदा केली जात असे. त्यामुळे लेखा खात्याचा धनादेश क्लिअरिंग होण्यास किमान तीन दिवसांचा कालावधी लागत असे. दरम्यानच्या काळात जर सुटीचा दिवस आला तर पेन्शनची रक्कम मिळण्यास अधिक विलंब होत असे व साधारणत: १० तारखेनंतरच पेन्शनधारकांच्या बॅँक खात्यात पैसे जमा होत होते. त्यानंतर रक्कम काढण्यासाठी बॅँकेत पेन्शनधारकांची झुंबड उडून त्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत होते. आता मात्र शासनाने त्यात बदल केला असून, मुंबईच्या स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या माध्यमातून ही सारी प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. सेवानिवृत्तांच्या पेन्शनची एकूण रक्कम लेखाकोष विभागाकडून थेट मुंबईच्या स्टेट बॅँक आॅफ इंडियाकडे वर्ग करण्यात येऊन तेथून स्टेट बॅँक त्या-त्या पेन्शनधारकांच्या वेगवेगळ्या बॅँका व त्यांच्या शाखांमध्ये पेन्शनची रक्कम जमा करेल, जेणेकरून त्याच दिवशी ही रक्कम पेन्शनधारकांच्या नावे जमा होईल.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून महाराष्ट्र बॅँक, देना बॅँक, स्टेट बॅँक अशा राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्येच पेन्शन खाते आहे. पूर्वी प्रत्येक बॅँकेत पेन्शनची रक्कम वर्ग करावी लागत असे. आता फक्त एकमेव स्टेट बॅँकेमार्फतच या साऱ्या बॅँकांकडे पेन्शनची रक्कम देण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण तीस हजारांहून अधिक पेन्शनधारक असून, जवळपास एक डझनहून अधिक बॅँका व त्यांच्या पुष्कळशा शाखा आहेत. परंतु नवीन प्रणालीमुळे आता ही प्रक्रिया सुटसुटीत झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Retired Pensioners Online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.