जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणावर परिणाम
By Admin | Updated: August 9, 2015 23:24 IST2015-08-09T23:24:07+5:302015-08-09T23:24:33+5:30
बॅरिकेडिंगची डोकेदुखी : पर्वणीकाळातील तीन दिवस परीक्षेचे

जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणावर परिणाम
नाशिक : साधुग्रामचे ध्वजारोहण आणि पहिल्या शाहीस्नानाची पर्वणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे संरक्षणासाठी शहरात उभारण्यात आलेल्या बॅरिकेडिंगमुळे स्थानिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्याची शक्यता मावळली असून, पर्वणीकाळात इंधनासह दूध आणि इतर वस्तूंचा साठा करणे क्रमप्राप्त झाले आहे.
तपोवन, रामकुंड, पंचवटी कारंजा, जुने नाशिक, हनुमानवाडी, रामवाडी, या भागातील नागरिकांना पर्वणीकाळात बॅरिकेड्सचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागणार आहे. ठिकठिकाणी करण्यात आलेल्या बॅरिकेडिंगमुळे स्थानिक रहिवाशांवर कोसळलेले पायपिटीचे संकट मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर कमी झाले असले तरी, पुढील कालात ते कायम राहणार आहे. रहिवाशांसाठी प्रशासनाकडून ओळखपत्र देण्यात येत असून, त्यासाठी छायाचित्र आणि आधारकार्डासह वाहनाची कागदपत्रेही मागविली जात आहेत.
रामकुंड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, पाथरवट लेन, सरदार चौक, तपोवन या भागातील रहिवाशांचे सर्वाधिक हाल होत आहेत. कारण या परिसरातून बहुतांश रस्ते रामकुंडाकडे येत असल्याने पोलिसांनी या ठिकाणी भाविकांच्या
गर्दीच्या नियंत्रणासाठी बॅरिकेडिंग लावून व्यवस्थापन करण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे.
पोलिसांकडून करण्यात आलेल्या बॅरिकेडिंगच्या ठिकाणाहून पुढे स्थानिक रहिवाशांनाही सोडले जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर पोलीस आयुक्तालयातून त्या नागरिकांसाठी पासेस देण्याची तयारी सुरू केली आहे.
त्यामुळे पर्वणीचे तीन दिवस सोडले तर इतर काळात या पासधारकांच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे; परंतु अद्याप प्रशासनाने त्यासाठी पासेस न दिल्याने रहिवाशांमध्ये साशंकता कायम आहे. पासेस मिळाल्यानंतरही पर्वणीकाळात तीन दिवस बंद राहणाऱ्या वाहतुकीमुळे रामकुंडाच्या मार्गावर असणाऱ्या सर्वच भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची समस्या निर्माण
होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने दोन दिवस आधीच हा साठा करून ठेवावा, असे आवाहनही केले आहे. (प्रतिनिधी)