व्यक्तिनिष्ठता फळाला
By Admin | Updated: February 25, 2017 00:30 IST2017-02-25T00:30:20+5:302017-02-25T00:30:55+5:30
सिन्नर : माणिकराव कोकाटे यांना धक्का

व्यक्तिनिष्ठता फळाला
शैलेश कर्पे : सिन्नर
व्यक्तिनिष्ठ राजकारणाची ओळख बनलेल्या सिन्नर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही मतदारांनी आमदार राजाभाऊ वाजे किंवा माजी आमदार माणिकराव कोकाटे या दोघांपैकी एकाच्याच पारड्यात मते टाकली. त्यामुळे शिवसेना व भाजपा वगळता अन्य पक्षांना खातेही खोलता आले नाही. नगरपालिकेपाठोपाठ सिन्नर पंचायत समितीतही शिवसेनेने एकहाती सत्ता मिळविल्याने भाजपाचे नेते व माजी आमदार माणिकराव कोकाटेंना तो धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी दमदार कामगिरी करतांना सिन्नर विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषदेच्या ७ गटांपैकी ६ गटांवर शिवसेनेचे सदस्य विजयी केल्याने सदर निवडणूक त्यांचे नाशिक जिल्ह्णात राजकीय वजन वाढविणारी ठरली आहे. गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्यावेळी राजाभाऊ वाजे राष्ट्रवादीत होते. तर माजी आमदार माणिकरव कोकाटे कॉँग्रेसमध्ये होते. त्यावेळी सिन्नर तालुक्यात कोकाटे यांच्या नेतृत्त्वाखाली कॉँग्रेसने ६ पैकी ४ गट जिंकले होते. तर राष्ट्रवादीला केवळ २ गट मिळवता आले होते. गेल्या पाच वर्षाच्या राजकारणात मोठा बदल झाला. वाजे शिवसेनेचे आमदार झाले तर कोकाटे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे या निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादीचा एकही जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य विजयी होवू शकला नाही. खरी लढत वाजे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना व कोकाटे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपा यांच्यातच रंगली. यात शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी बाजी मारली. भावनेच्या लाटेवर आमदार झाल्याच्या विरोधकांच्या आरोपांना वाजे यांनी आपल्या कामगिरीतून तडेतोड उत्तर दिल्याचे मानले जात आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्यावेळी सिन्नर पंचायत समितीच्या निवडणुकीत कोकाटे यांना सहा तर विरोधी वाजे यांना समसमान सहा जागा मिळाल्या होत्या. मात्र कोकाटे यांनी ऐनवेळी विरोधी पक्षाचा एक सदस्य गळाला लावून पाच वर्षे पंचायत समितीवर सत्ता राखली होती. यावेळी मात्र मतदारांनी आमदार वाजे यांच्या नेतृत्त्वाखाली पंचायत समितीवर आठ जागा विजयी करुन एकहाती सत्ता दिली आहे. पालिका निवडणुकीत शहरातील मतदारांना आमदार वाजे यांच्या बाजूने कौल देत पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवला होता. त्यानंतर ग्रामीण मतदारांनीही वाजे यांच्यावर विश्वास व्यक्त करीत तालुक्यातील ६ पैकी ५ गट शिवसेनेला बहाल केले आहेत. पूर्व भागात बोलकिल्ला म्हणून ओळखला जाणारा देवपूर गट माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना राखला. या गटात कोकाटे यांच्या कन्या कु. सिमंतिनी कोकाटे यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. आमदार वाजे यांनी कोकाटे यांच्या ताब्यातील मुसळगाव, नांदूरशिंगोटे व ठाणगाव गट खेचून आणण्यात यश मिळवले. कोकाटे यांच्या ताब्यातील तीन गट गेले आहेत. मात्र तालुक्यात शिवसेना व भाजपा उमेदवारांना मिळालेल्या आकडेवारीची बेरीज केल्यास फारसा फरक नसल्याचेही दिसते.
बंडखोरीचे ग्रहण
सिन्नर तालुक्याचा पूर्व भाग कोकाटे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अपेक्षेप्रमाणे कोकाटे यांनी देवपूर गट व त्यातील भरतूपर व देवपूर गणात मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. मात्र नांदूरशिंगोटे गटात गटबाजीचा फटका बसला. पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ यांनी बंडखोरी करीत राष्ट्रवादीकडून उमेवारी केल्याने भाजपाच्या मतांची विभागणी झाली. त्याचबरोबर पांगरी गणात पंचायत समितीच्या सभापती सौ. संगिता काटे यांचे पती विजय काटे यांनी अपक्ष उमेदवारी केली. या गणातून भाजपाचे रवींद्र पगार विजयी झाले. मात्र गेल्या दहा वर्षापासून ताब्यात असलेला नांदूरशिंगोटे हा गट कोकाटे यांच्या ताब्यातून गेला.