निकालापाठोपाठ आता वादाचेही ‘प्रयोग’
By Admin | Updated: December 7, 2015 23:56 IST2015-12-07T23:55:52+5:302015-12-07T23:56:30+5:30
राजकारणाचा दावा : रंगकर्मींचा तीव्र आक्षेप

निकालापाठोपाठ आता वादाचेही ‘प्रयोग’
नाशिक : राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल लागल्यानंतर लगोलग वादाचेही ‘प्रयोग’ रंगू लागले आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने सोमवारी जाहीर केलेल्या निकालावर ‘हयवदन’च्या चमूने आक्षेप घेतला असून, आपल्या नाटकाला केवळ राजकारणापोटी डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘माय डिअर शुबी’चे दिग्दर्शक प्रशांत हिरे यांनीही निकालावर नाराजी व्यक्त केली आहे.
राज्य नाट्य स्पर्धेत लोकहितवादी मंडळाचे ‘या ही वळणावर’, आर. एम. ग्रुपचे ‘माय डिअर शुबी’, ‘मेनली अमॅच्युअर्स’चे ‘या वळणावर’ व क. का. ललित कला महाविद्यालयाचे ‘हयवदन’ या नाटकांत चुरस होती. ‘हयवदन’ अखेरपर्यंत पारितोषिकाच्या शर्यतीत होते; मात्र त्याला डावलण्यात आल्याची चर्चा आज रंगली होती. ‘हयवदन’चे दिग्दर्शक रोहित पगारे यांनीही निकालावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या निकालात एकतर राजकारण झाले आहे वा परीक्षकच त्या कुवतीचे नव्हते. आमच्यापेक्षा उत्तम दर्जाचे नाटक झाले असते आणि आम्हाला पारितोषिक मिळाले नसते, तर आमचे काही म्हणणे नव्हते; मात्र तसे नसताना शेवटच्या क्षणी नाटकाला डावलण्यात आले. अनेक महिन्यांपासून प्रचंड मेहनतीने नाटक साकारले. नाटकातील कलावंत नवे असूनही त्यांनी अप्रतिम सादरीकरण केले; मात्र हेतुपुरस्सर डावलल्याने नवीन कलावंतांनी कामे करावीत की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या स्पर्धांत असे राजकारण होत राहिल्यास नव्यांना प्रोत्साहन कसे मिळेल, असा प्रश्नही पगारे यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)
शासनाला कळवणार
किमान तिसरा क्रमांक तरी मिळेल, अशी अपेक्षा होती. या निकालाविरोधात उद्या संस्थेच्या वतीने पत्र काढणार असून, शासनाकडेही आक्षेप नोंदवणार आहोत. अशा प्रकारचे निकाल लागले, तर नवीन मुले नाटकाकडे वळणारच नाहीत.
- रोहित पगारे,दिग्दर्शक, हयवदन