आहार शिजविण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची
By Admin | Updated: December 4, 2015 22:41 IST2015-12-04T22:40:32+5:302015-12-04T22:41:29+5:30
आहार शिजविण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची

आहार शिजविण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणारा शालेय पोषण आहार आता शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शिजविला जाणार आहे. पोषण आहाराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या योजनेच्या पद्धतीत काही बदल करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. येत्या नवीन वर्षापासून पथदर्शक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यात पोषण आहाराचा खर्च रोख स्वरूपात दिला जाणार आहे.
शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीत आतापर्यंत अनेक वेळा बदल झालेले आहेत. सुरुवातीला पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी शिक्षकांवर होती. त्यानंतर हे काम महिला बचतगटांमार्फत सुरू करण्यात आले होते; मात्र ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील मोेठी पटसंख्या असणाऱ्या शाळेत पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या व्यवस्थापन समितीवर सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात संबंधित शाळेला फक्त तांदळाचा पुरवठा करण्यात येणार आहे. पोषण आहार शिजविण्याचा खर्च, तेल, मीठ, डाळी आणि अन्य भाजीपाल्याचा खर्च रोख स्वरूपात देण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी शिजविण्यात येणारा पोषण आहार आणि अन्य शाळांमध्ये शिजविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जात काय फरक आहे, याची तुलना करण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती पातळीवरील पोषण आहार चांगला शिजत असल्यास, भविष्यात सर्व ठिकाणी ही संकल्पना राबविली जाणार आहे. यासाठी नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली.(प्रतिनिधी)