घाट स्वच्छतेची जबाबदारी पुरोहित संघावर सोपवा !

By Admin | Updated: July 25, 2014 00:37 IST2014-07-24T23:26:35+5:302014-07-25T00:37:59+5:30

जयंत शिखरे : बाहेरील वाहनांसाठी वाघेरेमार्गे नवीन रिंगरोडची निर्मिती व्हावी

Responsibility for cleanliness of the Ghat is entrusted to the priest. | घाट स्वच्छतेची जबाबदारी पुरोहित संघावर सोपवा !

घाट स्वच्छतेची जबाबदारी पुरोहित संघावर सोपवा !

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत करण्यात येणारी घाट योजना योग्य ठिकाणी असावी. या घाटांवर पूजाविधी करण्याचा अधिकार पुरोहितांचा असल्याने शासनाने सदर घाटाच्या स्वच्छतेची जबाबदारी पुरोहित संघाकडे सोपवावी, पुरोहित संघ शासनाच्या सहकार्याने घाटाची देखभाल करण्यास तयार आहे, असे त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाचे अध्यक्ष जयंत शिखरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर येथे आवश्यक त्या सोयी-सुविधांबाबत बोलताना जयंत शिखरे यांनी सांगितले, सर्वप्रथम कुशावर्त तीर्थाच्या स्वच्छतेकडे लक्ष पुरविले पाहिजे. कुशावर्तावर संगमनेर येथील गगनगिरी भक्तमंडळाने पाण्याच्या शुद्धतेसाठी फिल्ट्रेशन प्लॅँट बसविला आहे. पाणी शुद्धीकरणासाठी शासनानेही एक कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. परंतु केवळ प्लॅँट बसवून चालणार नाही, तर कुशावर्त तीर्थाच्या कायमस्वरूपी स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमधील रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. परंतु आजवर जुन्या रस्त्यांवरच भर टाकत गेल्याने रस्त्यांची उंची वाढली आहे. त्यामुळे रस्ते घराच्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. परिणामी रस्त्यावरचे पाणी घरात घुसते. रस्त्यांचे काम करताना जुने रस्ते फोडून नव्याने करायला हवेत. गावात पाणीपुरवठ्यासाठी नवीन एक्स्प्रेस पाइपलाइन टाकण्याचेही शासनाचे नियोजन आहे. परंतु ही पाइपलाइन टाकल्यानंतर त्यावर नव्याने नळजोडणी देण्यात येऊ नये. अन्यथा पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरी मोठ्या संख्येने साधू-महंत येणार आहेत. आखाड्यांसाठी शासनाने उत्तम निवारा शेड्स उभारले पाहिजेत. भाविकांसाठीही तात्पुरत्या स्वरूपात शेड्स उपलब्ध करून द्याव्यात. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात संगम घाटावर कायमस्वरूपी शेडची व्यवस्था केल्यास भाविकांना पूजाविधीसाठी उपयुक्त ठरेल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने स्थानिक स्वयंसेवकांना आत्तापासून प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तसे ओळखपत्रही दिले पाहिजे. मागील कुंभात स्वयंसेवकांना काही तास अगोदर ओळखपत्रे देण्यात आली होती. यावेळी त्याची पुनरावृत्ती होऊ नये. नाशिक-त्र्यंबकेश्वर हा रस्ता चौपदरी झाला असला तरी तो अपुराच पडणार आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी वाघेरेमार्गे रिंगरोडची निर्मिती करण्यात यावी. त्यामुळे वाहतुकीला अडथळे येणार नाहीत. वाहनतळापासून एसटी महामंडळाच्या गाड्या गावात भाविकांची ने-आण करत असतात. परंतु या गाड्या गावात न नेता त्या प्रयागतीर्थापर्यंतच आणल्या जाव्यात. जव्हाररोडला असलेल्या बसस्थानकाची सुधारणा होणे आवश्यक आहे. याठिकाणी शौचालय, स्वच्छतागृह या सुविधा पुरवाव्यात. बसस्थानकात भाविकांसाठी आणखी दोन-तीन प्रवासी शेड्स उभारावेत. प्रयागतीर्थाजवळही एक तात्पुरते बसस्थानक उभारले पाहिजे. इगतपुरी-नाशिकरोड येथून येणारे भाविक त्याठिकाणी येऊन पायी गावात येऊ शकतील. जव्हार-गुजरातकडील भाविकांसाठी सापगाव येथे तात्पुरते बसस्थानक उभारले जावे. चौकीमाथ्याकडून रिंगरोडची निर्मिती करावी. कुंभमेळ्यात स्थानिक गावकऱ्यांना त्रास होणार नाही, याचीही दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे. आपत्कालीन स्थितीत गावातील वाहने बाहेर पडण्यासाठी मार्गाची व्यवस्था करावी. रेड स्वस्तिकच्या स्वयंसेवकांनी अलाहाबाद येथील कुंभात वाहतूक नियोजनाबाबत मोठी भूमिका निभावली. त्र्यंबकेश्वर येथेही रेड स्वस्तिकच्या स्वयंसेवकांना निमंत्रित करण्याचे नियोजन आहे. पुरोहित संघ व प्रशासन यांच्यात उत्तम समन्वय आहे. जिल्हा प्रशासनाने मागील कुंभमेळ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याकडेच पुन्हा एकदा मेळा अधिकाऱ्याची जबाबदारी सोपविल्याने पुष्कळसे काम सोपे होणार आहे. त्र्यंबकेश्वरी आता श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यादृष्टीने नगरपालिका गावातील अतिक्रमणे हटविणार आहेत. यंदाचा तिसरा श्रावणी सोमवार हा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रंगीत तालीम म्हणूनच पाहिला जावा. त्यादृष्टीने नगरपालिकेने व्यवस्थापन करावे,
अशी सूचनाही जयंत शिखरे यांनी केली.
गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा नेहमीच चर्चिला जातो. परंतु गोदावरी स्वच्छतेचा मुद्दा केवळ संगम घाटापुरताच मर्यादित नसावा, तर गोदावरीच्या उगमस्थानापासून ब्रह्मगिरी ते गंगापूर धरणापर्यंत स्वच्छतेचे नियोजन केले जावे. कुंभमेळ्यात कुशावर्त तीर्थ ते कंठतीर्थ या दरम्यान कंठ प्रदक्षिणा केली जाते. या कंठ प्रदक्षिणेच्या विशेष तारखाही पुरोहित संघाकडून लवकरच घोषित केल्या जातील, असेही जयंत शिखरे यांनी सांगितले.

Web Title: Responsibility for cleanliness of the Ghat is entrusted to the priest.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.