खासगी भागीदारीद्वारे घरकुल प्रस्तावाला प्रतिसाद
By Admin | Updated: April 27, 2017 01:28 IST2017-04-27T01:26:52+5:302017-04-27T01:28:00+5:30
नाशिक :प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचा लाभ मिळविण्यासाठी ६७ अर्जांची विक्री झाली असली तरी आतापर्यंत १६ हजार ५९७ अर्ज प्राप्त झाले आहेत.

खासगी भागीदारीद्वारे घरकुल प्रस्तावाला प्रतिसाद
नाशिक : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या तीन घटकांमध्ये घरकुलांचा लाभ मिळविण्यासाठी ६७ अर्जांची विक्री झाली असली तरी आतापर्यंत १६ हजार ५९७ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याच्या प्रकारात सर्वाधिक ९५५० अर्ज महापालिकेकडे दाखल झाले आहेत.
महापालिकेकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत झोपडपट्टीनिहाय सर्वेक्षण सुरू आहे. तत्पूर्वी, झोपडीधारक वगळता अन्य तीन प्रकारच्या घटकांसाठी महापालिकेने अर्ज मागविले होते. त्यात घटक क्रमांक २ मध्ये कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याकरिता सहाही विभाग मिळून ४३३७, घटक क्रमांक तीनमध्ये खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याकरिता ९५५० तर घटक क्रमांक ४ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थींद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यासाठी मिळणाऱ्या अनुदानाकरिता २७१० अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी दि. ३० एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत आणखी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने, खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याकरिता सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्यांचे कुटुंबांचे प्रति वर्ष उत्पन्न ३ लक्ष रुपयांपर्यंत असेल ते या घटकासाठी अर्ज करू शकतात. या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून १.५० लक्ष तर राज्य सरकारकडून १ लक्ष रुपये अनुदान प्राप्त होणार आहे. दरम्यान, झोपडपट्टीनिहाय सर्वेक्षण पश्चिम व सातपूर विभागात पूर्ण झाले असून, लवकरच अन्य विभागातही सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली. (प्रतिनिधी)