पीककर्ज मर्यादेत वाढ करण्याचा ठराव

By Admin | Updated: September 22, 2015 00:09 IST2015-09-22T00:08:41+5:302015-09-22T00:09:02+5:30

जिल्हा बॅँक वार्षिक सभा : सुरक्षारक्षकांसह सभासद प्रतिनिधी घेण्याची एकमुखी मागणी

Resolution to increase in the crop loan limit | पीककर्ज मर्यादेत वाढ करण्याचा ठराव

पीककर्ज मर्यादेत वाढ करण्याचा ठराव

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पीककर्ज मर्यादेत वाढ करण्यात यावी, सभासदांमधून एक प्रतिनिधी संचालक म्हणून घेण्यात यावा, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा गेल्या १८ वर्षांत वाटप न केलेला लाभांश वाटप करण्यात यावा, बॅँकेच्या शाखांवर सुरक्षारक्षक नियुक्त करताना तो सभासदांच्या पाल्यांतून नेमण्यात यावा यांसह विविध मागण्यांचे ठराव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सभेत एकमताने मंजूर करण्यात आले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल (दि.२१) बॅँकेच्या जुन्या मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या तळमजल्यातील सभागृहात अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष सुहास कांदे, संचालक खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, आमदार अपूर्व हिरे, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, धनंजय पवार, किशोर दराडे, जि. प. सभापती केदा अहेर, अ‍ॅड. संदीप गुळवे, नामदेव हलकंदर, गणपतराव पाटील, अद्वय हिरे, डॉ. शोभा बच्छाव, सचिन सावंत, महापालिका स्थायी सभापती शिवाजी चुंभळे आदि उपस्थित होते. प्रास्ताविकात अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी बॅँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा बॅँकेच्या वतीने १२०० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले असून, अजूनही २०० कोटी कर्जाची मागणी आहे. बॅँकेच्या वतीने वाढीव पीककर्ज देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पीककर्ज वाटपापोटी बॅँकेला मागील दोन वर्षांत
अनुक्रमे १८ व ३३ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. कार्यकारी संचालक सुभाष देसले यांना राज्य स्तरीय कार्यबल समितीच्या मान्यतेच्या अपेक्षेवर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बॅँकेचा एनपीए कमी करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करीत आहे. त्यानंतर सभासद राजाराम मोरे म्हणाले, आधी प्रशासक आता संचालक मंडळ आले आहे, आता तरी चांगले कामकाज करा. साहेबराव शिंदे यांनी सभासदांच्या खात्यावर थेट नफा वर्ग करण्याची सूचना केली. मालेगावचे शेवाळे व काकड यांनी बॅँकेतील वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी संचालक मंडळांनी काय उपाययोजना केली, अशी विचारणा केली. बागड यांनी सर्वसाधारण सभेच्या दहा मिनिटे आधी अहवाल वाचनास मिळतो. तोे दोन दिवस आधी मिळावा, अशी सूचना केली. गोविंद शुक्ल यांनी बॅँकेच्या सभासदांची संख्या १८०० च्या घरात असल्याने सभासदांमधून एक संचालक नियुक्त करण्याचा ठराव मांडला.
पां.भा.करंजकर म्हणाले, मागील संचालक मंडळाने त्यांचे पाप सिंहस्थात स्नान केल्याने धुतले असेल, सभेत इतिवृत्त केवळ मंजुरीसाठी ठेवू नका, त्यांची अंमलबजावणी करा,अशी सूचना केली. तानाजी गायधनी यांनी निफाड आणि नाशिक साखर कारखाने बंद पडल्याने त्यांचे बॅँकेला व्याज मिळत नाही. त्यामुळे बॅँकेचा एनपीए वाढला. या साखर कारखान्यांना कर्ज देताना जिल्हा बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा लेखा परीक्षणात ठपका ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गुलाबचंद बागमार यांनी संचालकांना चिमटे काढून तुमचे हेवेदावे आणि राजकारण बाजूला ठेवा. कामकाज चांगले करा,असे सांगतानाच ताळेबंदात जो नफा दिसतो आहे, तो बोगस असल्याचा आरोप केला. यावेळी शिवनाथ दरगोडे,सुरेश भोज, शांताराम जाधव,मनोहर देवरे, सदू पानगव्हाणे, कैलास बोरसे,विजय मोेगल यांनीही मनोगत व्यक्त केले. पीक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात यावी,सुरक्षारक्षक नेमताना सभासदांचेच पाल्ये घ्यावेत, कारखान्यांना कर्ज पुरवठा करून कारखाने सुरू करावेत, अशा सूचना केल्या. शिरीषकुमार कोतवाल व माणिकराव कोकाटे यांनी नाबार्ड आणि राज्य शिखर बॅँकेने घालून दिलेल्या नियमानुसारच कर्च पुरवठा करता येतो. कारखान्यांना कर्ज पुरवठा देण्याबाबत फेरमूल्यांकनाचा मार्ग स्वीकारून तसे प्रयत्न करण्यात येईल,असे आश्वासन दिले. यावेळी राघो नाना अहेर,डॉ.सुनील ढिकले, डॉ.सुचेता बच्छाव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, संजय तुंगार,डॉ.गिरीश मोहिते आदिंसह बॅँकेचे सभासद उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Resolution to increase in the crop loan limit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.