पाणी सोडण्यास सेना आमदारांचा विरोध
By Admin | Updated: October 18, 2015 23:29 IST2015-10-18T23:29:03+5:302015-10-18T23:29:28+5:30
जनआंदोलन : गंगापूर धरणावर आज ठिय्या

पाणी सोडण्यास सेना आमदारांचा विरोध
नाशिक : गंगापूर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात १.३६ टीएमसी पाणी वहन मार्गाने सोडण्यास जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी कडाडून विरोध दर्शविला असून, गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचीच सुरुवात म्हणून सोमवारी
(दि. १९) सकाळी ११ वाजता गंगापूर धरणावर शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अनिल कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार अनिल कदम आणि आमदार राजाभाऊ वाजे यांनी पत्रकारांशी बोलताना वस्तुस्थिती समोर मांडत सांगितले, महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी व वस्तुस्थिती जाणून न घेता घेतलेला आहे. मुळात गंगापूर धरण ते जायकवाडी हे अंतर २३४ कि.मी. असून, प्रस्तावित १.३६ टीएमसी (३८.३८ एमसीएफटी) पाणी हे वहन मार्गाने जायकवाडीपर्यंत जाऊन पोहोचूच शकणार नाही. वीजपुरवठा खंडित करून हा प्रयत्न यशस्वी होणार नाही शिवाय वहन मार्गाने ८० टक्के पाण्याची गळती होऊन वाया जाणार आहे. २०१२-१३ मध्येही मराठवाड्यातील टंचाईची स्थिती उद्भवली तेव्हा तीन आवर्तने देण्यात आली होती, परंतु पाणी जायकवाडीपर्यंत जाऊन पोहोचू शकले नव्हते. पिण्यासाठी पाणी जरूर द्यायला हवे, परंतु त्यासाठी वहनमार्गाने पाणी सोडणे हा काही उपाय होत नाही.