स्थायीच्या दोघा सदस्यांचे राजीनामे
By Admin | Updated: March 3, 2015 00:32 IST2015-03-03T00:32:39+5:302015-03-03T00:32:50+5:30
सेना-मनसेत घोळ सुरूच : हालचालींना वेग

स्थायीच्या दोघा सदस्यांचे राजीनामे
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीवर आठ सदस्यांची नव्याने निवड झाल्यानंतर सभापतिपदासाठी हालचालींना वेग आला असतानाच सेना, मनसे आणि अपक्ष गटाकडून पक्षपातळीवर आपल्या सदस्यांचे राजीनामे घेऊन नव्या सदस्यांना संधी देण्याच्या दृष्टीने दिवसभरात झालेल्या घडामोडीत अपक्ष गटाचे पवन पवार आणि रिपाइंचे सुनील वाघ यांनी स्थायी समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा महापौरांकडे सुपूर्द केला आहे. सत्ताधारी मनसेचा एक आणि सेनेचे दोन सदस्य राजीनामा न देण्यावर ठाम असल्याने आणि त्यातच महापौरांनी प्रत्यक्ष सदस्यानेच राजीनामा दिल्यानंतरच तो स्वीकारण्याचे स्पष्ट केल्याने सेना-मनसेत रात्री उशिरापर्यंत राजीनामा प्रकरणावरून खल सुरू होता.
महापालिकेच्या स्थायी समितीवर प्रत्येक वर्षी नवीन लोकांना संधी मिळावी, यासाठी पक्षपातळीवर शिवसेना, रिपाइं, मनसे, राष्ट्रवादी आणि अपक्ष गटाने मागील वर्षापासून एक वर्षाचा फार्मुला वापरला होता. त्यानुसार शिवसेनेचे सचिन मराठे, वंदना बिरारी, रिपाइंचे सुनील वाघ, राष्ट्रवादीचे शोभा आवारे, राजेंद्र महाले आणि रूपाली गावंड, अपक्ष गटाचे पवन पवार आणि महापौरपदी अशोक मुर्तडक यांची निवड झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर मनसेकडून सविता काळे यांची निवड करण्यात आली होती. सदर सदस्यांची एक वर्षाच्या कालावधीसाठी निवड करताना पक्षाने त्यांच्याकडून राजीनामेही लिहून घेतले होते. आता सदर सदस्यांचा वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर राष्ट्रवादीने आपल्या तीन सदस्यांच्या रिक्त जागांवर छाया ठाकरे, नीलिमा आमले व शिवाजी चुंभळे यांची निवड केली.