दोनशे खाटांच्या रुग्णालयाबरोबरच औषधांची प्रतीक्षा पर्वणीची परवड : जिल्हा रुग्णालय
By Admin | Updated: April 20, 2015 01:43 IST2015-04-20T01:42:52+5:302015-04-20T01:43:26+5:30
दोनशे खाटांच्या रुग्णालयाबरोबरच औषधांची प्रतीक्षा पर्वणीची परवड : जिल्हा रुग्णालय

दोनशे खाटांच्या रुग्णालयाबरोबरच औषधांची प्रतीक्षा पर्वणीची परवड : जिल्हा रुग्णालय
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपला आहे़ सिंहस्थातील पर्वणीकाळात नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने सुमारे १४ कोटींचा आराखडा तयार केला आहे़ या आराखड्यानुसार सकृतदर्शनी केवळ जिल्हा रुग्णालयातील इमारतीचे बांधकाम सुरू असून, त्याचे पूर्णत्व व रुग्णालयातील अधिकच्या औषध साठ्याबाबत साशंकताच आहे़ नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा हा पावसाळ्यात असल्याने या काळात साथीचे रोग मोठ्या प्रमाणात बळावतात़ त्यातच पर्वणीकाळात लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये येतील, असा प्रशासनानेच अंदाज व्यक्त केला आहे़ भाविकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सिंहस्थाच्या निमित्ताने जिल्हा रुग्णालयात दोनशे बेडच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे़ ५़३६ कोटी रुपये खर्च करून बांधल्या जाणाऱ्या या इमारतीचे आरसीसी बांधकाम पूर्ण झाले असून, बाहेरून प्लास्टर सुरू आहे़ या नवीन रुग्णालय इमारतीमध्ये सुसज्ज आॅपरेशन थिएटर, ओपीडी तसेच रुग्ण व स्टाफची संपूर्ण व्यवस्था असणार आहे़ तसेच या इमारतीचे बांधकाम ७५ टक्के पूर्ण झाल्याचा व मे महिन्याच्या अखेरपर्यंत इमारत पूर्ण करण्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे़ मात्र, सद्यस्थितीत या इमारतीच्या टाईल्स, खिडक्या अशी किमान डझनभर कामे बाकी आहेत.त्यामुळे मे अखेरपर्यंत या इमारतीचे काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे़ तसेच या इमारतीसाठी आवश्यक असलेले फर्निचर, लिफ्ट, वैद्यकीय उपकरणे, खाटा, प्रयोगशाळा साहित्य, किरकोळ साहित्य याबाबत काय? असाही प्रश्न समोर आला आहे़